jitendra awhad files complaint Against Mahesh aher: ठाण्यात प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेता असा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आता आव्हाडांनी आहेरांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारीत जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांनी वर्तकनगर पोलीस ठाणे पोलिसांना तक्रार दिली आहे. महेश आहेर आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम 108, 108 (अ), 120 (ब), 302, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 7, 11, 12, 13 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांनी महेश आहेर यांच्यावर काय केले आहेत आरोप?
जितेंद्र आव्हाडांनी तक्रारीत म्हटलेलं आहे की, “मी गृहनिर्माण मंत्री असताना ठाणे महापालिका हद्दीत होत असलेल्या बेकायदा बांधकामांबद्दल व महापालिकेच्या इतर चुकीच्या कार्यपद्धतीबद्दल मला निदर्शनास आणू दिली.”
“आरोपी महेश आहेर हे संदिग्ध व अयोग्य कागदपत्रांच्या आधारावर ठाणे महापालिकेत कार्यरत असल्याबाबत मला माहिती मिळाली. मी त्यांच्याबाबत माहिती घेत असून, आहेरांविरुद्ध भ्रष्टाचाराच्याही तक्रारी आहेत. याबद्दल योग्य कारवाई होण्याबद्दल मी अधिकाऱ्यांना संपर्क करीत असल्यानं आहेर याने माझ्याविरुद्ध आणि माझी मुलगी नताशा जितेंद्र आव्हाड म्हणजेच नताशा अॅलन पटे व तिचे पती अॅलन पटेल यांच्याबद्दल कटकारस्थान रचून घातपात करण्याची दाट शक्यता होती.”
“नंतर मला माझी मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याचा कट केल्याबद्दलचा ऑडिओ मिळाला. ऑडिओ क्लिपमधून आरोपी महेश आहेरने संघटित गुन्हेगार लोकांशी संपर्क केले आहेत. त्याचे अंडरवर्ल्डच्या कुख्यात गुंडांशी व्यवहारिक संबंध आहे. त्यामुळे भारत व भारताबाहेर त्याच्या सांगण्यावरून कुणालाही ठार मारणे त्यांच्यासाठी शक्य आहे.”
“ऑडिओ क्लिपमधून असं कळलं की, माझी मुलगी नताशा स्पेनमध्ये आहे. महेश आहेर याने त्याचे शूटर लावले असून, तो नताशा हिचा स्पेन येथील पत्ता शोधून तिच्या नवऱ्याचा घातपात करायचा किंवा जावयाचे सासरे वा नातेवाईकांवर हल्ला करून त्याला भारतात येण्यास भाग पाडायचं.”
“विमानतळापासून फिल्डिंग लावून त्याला जीवे मारून टाकायचं. महेश आहेरनं असंही म्हटलंय की, फिल्डिंग लावली आहे. त्यांचा गेम करणार. याच्या पोरीला रडायला लावणार असंही त्या क्लिपमध्ये आहे,” असं आव्हाडांनी म्हटलं आहे.
“माझा व माझ्या परिवाराचा काटा काढण्यासाठी त्याने भारत व भारताबाहेरही पूर्ण तयारी करून ठेवली आहे, अशी खात्रीलायक माहिती मला समजली आहे. क्लिपमध्ये आहेरचं म्हणणं आहे की, त्याच्याकडे दररोज 40-50 लाख रुपये येतात व संघटित गुन्हेगारी गँगशी कनेक्टेड आहे”, असं आव्हाडांनी तक्रारीत म्हटलं आहे.
“हे स्पष्ट होत आहे की मला आणि माझ्या कुटुबियांना महेश आहेर याने जीवे मारण्यासाठी संघटित गुन्हेगारी घटकांचा वापर करून आवश्यक तयारी करून आवश्यक कट कारस्थान केलेले आहे. माझ्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे”, असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.
आव्हाड तक्रारीत म्हणतात, “महेश आहेर हा सर्वसामान्यांसाठी ठाणे महापालिकेतील कर्मचारी असल्याचं भासवतो. परंतु तो एका संघटित गुन्हेगारीचा म्होरक्या असून, तो वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गुन्हेगारी संघटनेचा वापर करीत आहे.”
“मला व कुटुंबियांना जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेले कारस्थान व त्यासाठी आवश्यक असलेल्या संघटित गुन्हेगारीचा व भ्रष्टाचाराच्या पैशाचा दुरुपयोग, या सगळ्या बाबी गंभीर व दखलपाभ असल्यामुळे आपण गुन्हा नोंदवून तपास करावा,” अशी मागणी आव्हाडांनी केली आहे.
ADVERTISEMENT