‘…तर नवी पिढी मराठ्यांचा खरा इतिहास कायमचा विसरून जाईल’, जितेंद्र आव्हाड भडकले

मुंबई तक

08 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:38 AM)

छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांचा उल्लेख करत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शो बंद पाडला. यावरून वाद पेटला असून, आता जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडलीये. हर हर महादेव चित्रपट वादावर जितेंद्र आव्हाड यांनी […]

Mumbaitak
follow google news

छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमांचा उल्लेख करत ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड होत असल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आणि ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली शो बंद पाडला. यावरून वाद पेटला असून, आता जितेंद्र आव्हाडांनी सविस्तर भूमिका मांडलीये.

हे वाचलं का?

हर हर महादेव चित्रपट वादावर जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेली पोस्ट… जशीच्या तशी

मराठ्यांच्या इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूने?

शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?

त्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहेत मग भले तो माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असो, कारण त्यांचे स्वराज्य हे मराठी लोकांचे हक्काचे राज्य होते जिथे सर्व रयतेला समान प्रेमाने आणि न्यायाने वागवले जात होते. जेव्हा जेव्हा स्वराज्यावर संकट आले तेव्हा तानाजी मालुसरे, जीवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर, तानाजी मालुसरे अशा सर्व जातीधर्मांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले, कारण ह्या सगळ्या मावळ्यांची एकच ओळख होती… मराठा! गेल्या 60-70 वर्षात मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचे असंख्य प्रयत्न ब. मो. पुरंदरे व त्यांच्या देशी-विदेशी शिष्यांनी हेतुपुरस्सर केले ज्यात महाराजांचा जन्म, त्यांचे पिता, त्यांचे अध्यात्मिक व राजकीय गुरू, त्यांचे पुत्र संभाजीराजे यांचेबाबत जाणीवपूर्वक अफवा उडवून महाराजांना ब्राम्हणशाहीच्या अधीन असणारा एक मुस्लिमद्वेष्टा राजा अशा रुपात दाखवले गेले.

हर हर महादेव वाद : जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप, अभिजित देशपांडेंनी सांगितले पुस्तकाचं नाव

स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि नंतरच्या काळात शरद पवार साहेबांच्या काळात इतिहास संशोधनाची साधने, संस्था आणि त्यासाठी लागणारा निधी जेव्हा बहुजन समाजातील अभ्यासक लोकांच्या हाती आले तेव्हा शिवाजीमहाराजांचा आणि एकूणच मराठ्यांचा खरा इतिहास हळूहळू जगासमोर यायला लागला. गोब्राम्हणप्रतिपालक ही महाराजांची मुद्दाम निर्माण केलेली प्रतिमा बदलून ते कुळवाडीभूषण बनले. रामदास हे महाराजांचे गुरु नव्हते हे सिद्ध करताना मा.म. देशमुख यांनी संशोधन क्षेत्रात आणि अगदी कोर्टातही मोठा संघर्ष केला. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत अकारण गोंधळ निर्माण केल्याबद्दल ब. मो. पुरंदरे यांच्याकडून पंढरपूरमध्ये अक्षरशः माफीनामा लिहून घेतला गेला. जेम्स लेनला हाताशी धरून आई जिजाऊंची बदनामी करणाऱ्या संस्थांना योग्य धडा शिकवला गेला. आणि तिथे हे स्पष्ट झाले की इथून पुढे शिवाजी महाराजांच्या बाबतीत कुणाला खोटा इतिहास लिहिता येणार नाही!

‘हर हर महादेव’वरून ठाण्यात राडा! प्रेक्षकाला मारहाण, जितेंद्र आव्हाडांसह 100 जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासात लिहून आपला सनातनी अजेंडा घुसवता येत नाही हे पाहून मग अलीकडेच्या काळात पुरंदरेछाप प्रवृत्तींनी इतिहासाचे विकृतीकरण करायला सिनेमा हे माध्यम निवडले, ज्याचा प्रसार सर्वदूर आहे आणि ज्याचा परिणाम पुस्तकांपेक्षा दीर्घकाळ टिकतो. “हा चित्रपट ऐतिहासिक दस्तऐवज नाही” अशी कायदेशीर आणि ऐतिहासिक जबाबदारी झटकून टाकणारा disclaimer एकदा पडद्यावर दिसला की नंतर “सिनेमॅटिक लिबर्टी” ह्या नावाखाली त्या सिनेमात इतिहासाची यथेच्छ मोडतोड आणि विपर्यास करायचे जणू काही लायसन्स तो सिनेमा बनवणाऱ्या लोकांना मिळून जाते. महाराजांच्या नावाने मग काहीही अतर्क्य, अनैतिहासिक गोष्टी पडद्यावर दाखवून स्वतःचा सनातनी अजेंडा या लोकांनी परत एकदा इतिहासात घुसवायला सुरुवात केला, जो त्यांना आता पुस्तक लिहून करता येत नव्हता. सोबत सेन्सॉर बोर्ड कशाला आडकाठी करत नाही त्यामुळे कसली भीतीच नाही. अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास विकृत करण्याचा नवा खेळ सुरू झाला.

इतिहासाचा खेळ करणाऱ्या चित्रपटांना बॉयकॉट करावं : संभाजीराजेंनंतर शिवेंद्रराजेही आक्रमक

‘तान्हाजी’ या हिंदी सिनेमात तान्हाजी मालुसरे थेट नृत्य करताना दिसतात, साधूच्या नकली वेशात ते चक्क शिवाजी महाराजांना सुनावतात, चक्क जिजाऊंना कोंढाण्यावरून हुसकावून लावताना दाखवले जाते जे इतिहासात कधीही घडले नाही. या सिनेमात उदेभान हा मुघलांच्या बाजूने लढणारा राजपूत सरदार मात्र मुसलमानाच्या वेशात दाखवला जातो कारण मुस्लिमांप्रती द्वेष वाढवणे हा सनातनी अजेंडा राहतोच. ऐतिहासिक चुकांनी भरलेला हा सिनेमा यशस्वी झाला आणि सनातनी लोकांचा हुरूप अजुन वाढला. “पावनखिंड” या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे एखाद्या ठिल्लर मवाल्यासारखे मुघल सरदाराला “चल” असे म्हणतात तर “हर हर महादेव” सिनेमात बाजीप्रभू “घंटा!” अशी टपोरी भाषा वापरताना दिसतात. पावनखिंड सिनेमात बाजीप्रभूंच्या घरातील विधवा स्त्रिया चित्पावन विधवा नेसायच्या ते आलवण नेसताना दिसतात, जेव्हा की बाजीप्रभू हे चित्पावन ब्राम्हण नव्हते तर कायस्थ होते. “सरसेनापती हंबीरराव” या सिनेमात हंबीरराव एका मुघल सरदारासोबत डायलॉगबाजी करत मैत्रीपूर्ण कुस्ती करत आहेत, आणि कडेने मावळे प्रोत्साहन देत आहेत. खुद्द महाराज, जिजाऊ, तान्हाजी, बाजीप्रभू, हंबीरराव यांच्या नावाने काहीही खपवून नेमके काय साध्य करायचे आहे हा चिंतनाचा विषय आहे.

“हर हर महादेव” या सिनेमात तर विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे. “शेर शिवराज” सिनेमात महाराजांना स्वप्न पडते ज्यात देवी भवानी त्यांना येवुन सांगते की ती खानाने तिचा अपमान केला आहे आणि ती खानाचा बदला महाराजांच्या माध्यमातून घेईल. थोडक्यात, दोन्ही सिनेमात महाराजांनी खानाचा केलेला वध हा फक्त दैवी शक्तीने घडला होता आणि त्यात महाराज फक्त निमित्तमात्र होते हाच संदेश आहे. महाराजांच्या व मावळ्यांच्या युद्धनितीला, शौर्याला दैववादाच्या पायाशी लोळण घेताना दाखवणे हा नक्कीच सनातनी कावा आहे!

“राष्ट्रवादीच्या डोक्यातून ‘जात’ अजिबात जात नाही”, शरद पवारांचा उल्लेख, मनसे नेत्यांचं टीकास्त्र

शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सिनेमाच्या माध्यमातून वारंवार विकृत मांडणी करणारे दिग्दर्शक सनातनी मनुवादी आहेत या सर्व लोकांच्या मागे मोठमोठाले प्रोडक्शन हाऊसेस कुणाच्या तरी सांगण्यावर उभे आहेत कारण हे त्यांच्या इशाऱ्यावर मराठ्यांचा इतिहास विकृत करायचे सनातनी कार्य करत आहेत. आणि ह्या विकृत कार्याचा वेग इतका मोठा आहे की दर 2-3 महिन्याला एक ह्या वेगाने असे इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे थिएटर, OTT आणि टिव्हीवर येवून तरुण पिढीला खोटा इतिहास शिकवत आहेत. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्यासारख्या महाराजांच्या वंशजांनी ह्या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी इतके हे प्रकरण हाताबाहेर गेले आहे. सनातन्यांनी ही विषवल्ली इथेच ठेचली गेली नाही तर येत्या काळात ह्या प्रोपगंडाला बळी पडलेली नवी पिढी मराठ्यांचा खरा इतिहास कायमचा विसरून जाईल. रात्र वैऱ्याची आहे!

– डॉ. जितेंद्र आव्हाड

    follow whatsapp