नंदूरबार: नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (District Collector Dr. Rajendra Bharud) यांचं खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलेलं असताना दुसरीकडे नंदूरबारमधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला अॅट्रोसिटी प्रकरणात (atrocity case) अटक केल्यानंतर आता जिल्हाधिकारी भारुड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. पत्रकार योगेंद्र दोरकर यांच्या एका अग्रलेखानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे दोरकर यांच्या कुटुंबीयांसह भारतीय जनता पक्षाच्या खासदार हिना गावित (Heena Gavit) यांनी गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
नंदूरबारमधील गरीब आदिवासींना कोरोना साथीच्या काळात उपचारांसाठी सीएसआर फंडातून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले होते. त्यापैकी जवळजवळ एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची खासगी संस्थेला थेट विक्रीसाठी दिली. असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केला आहे.
नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी हे पत्र मिळाल्यानंतर रोटरी वेलनेस सेंटर यांना शासकीय दरात 1 हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावे अशा स्वरुपाचे आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला.
‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’
नंदूरबारच्या गरीब रुग्णांसाठी पाठविण्यात आलेले रेमडेसिवीर हे शिवसेनेच्या नेत्याशी संबंधित खासगी संस्थेला देण्यात आल्याने याप्रकरणी जिल्हाधिकारी भारुड यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार गावित यांनी केली आहे.
दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
अटक करण्यात आलेल्या पत्रकार दोरकर यांच्या कुटुंबीयांनी काय आरोप केले?
‘राज्यात कोरोना रुग्ण हे रेमडेसिवीरसाठी वणवण करत असताना नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन एक प्रकारे मोठा घोटाळाच केला आहे आणि याचबाबत योगेंद्र दोरकर यांनी भर पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्याने आणि त्यासंबंधी अग्रलेख लिहल्याच्या आकसातून राजेंद्र भारूड यांनी अटकेची कारवाई केली आहे.’ असा आरोप दोरकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
‘नंदूरबारच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी आपण चांगले अधिकारी असल्याची इमेज बनविण्याचा मागील काही दिवसांपासून प्रयत्न केला आहे. मात्र त्याचवेळी योगेंद्र दोरकर यांनी भारुड हे भ्रष्ट अधिकारी असल्याचं आपल्या वृत्तपत्रातून मांडण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी आमच्या मागे एकूण सगळा शासकीय फौजफाटा लावला आहे. शासनाने रोटरी वेलनेस दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री ही तब्बल 10 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या किंमतीला झाली आहे. त्यामुळे यात किती मोठा घोटाळा झालेला असू शकतो याचा आपण विचार करु शकता.’ असंही दोरकर यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
नर्सने चोरून विकले रेमडेसिवीर, घरातही सापडले ‘एवढे’ इंजेक्शन
‘खरं तर 17 एप्रिलला कृष्णा परिसर जलविकास संस्था हे अम्युझमेंट पार्क ज्याचे सचिव योगेंद्र दोरकर आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन सील करण्यात आलं. हे पार्क दोरकर यांना 2037 सालापर्यंत सरकारकडून लीझवर देण्यात आलेलं आहे. मात्र, हेच पार्क जिल्हाधिकाऱ्यांनी सील करुन टाकलं. एवढंच नव्हे तर 21 एप्रिलला दोरकर यांचा अग्रलेख प्रसिद्ध होताच त्यांना अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात दाखलही करण्यात आली. यावेळी तब्बल 100 पोलीस आमच्या घरी आले होते. खरं तर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. त्यामुळे याप्रकरणी योगेंद्र दोरकर यांची तुरुंगातून सुटका करुन जिल्हाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.’ अशी मागणी दोरकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!
जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचं नेमकं उत्तर काय?
दरम्यान, ‘मुंबई तक’ने जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणी त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत बोलताना हे जिल्हाधिकारी भारूड यांनी दोरकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
‘सगळ्यात आधी रेमडेसिवीर इंजेक्शन हे रोटरी वेलनेस सेंटर यांनी नियमानुसार देण्यात आले आहेत. जर एखाद्या ठिकाणी रुग्णांना आवश्यकता असल्यास आणि खासगी वितरकाकडे रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसतील तर स्थानिक प्रशासनाकडून ते लोन पद्धतीने घेता येतील. त्यामुळे याच पद्धतीने रोटरी सेंटरला रेमडेसिवीर देण्यात आले आहेत. ज्याचे शासकीय पातळीवर पत्र व्यवहार देखील झाले आहेत. तसेच रोटरी सेंटरला देण्यात आलेले रेमडेसिवीर हे लवकरात लवकर परत देण्याबाबत देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा सगळा व्यवहार पारदर्शक आहे.’
‘दुसरी गोष्ट, योगेंद्र दोरकर यांना अटक केल्यानंतर 24 तासात त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसारच दोरकर यांना तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. तसंच दोरकर यांचा जो अम्युझमेंट पार्क आहे तिथे काही बेकायदेशीर काम सुरु होती. त्यामुळेच त्यांचा अम्युझमेंट पार्क हा सील करण्यात आला आहे. जर त्यांना याविषयी काहीही आक्षेप असेल तर त्यांनी हायकोर्टात जावं.’
‘सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोरकर यांनी माझ्याविरोधात लिहलेला अग्रलेख हा अतिशय असंसदीय भाषेत लिहण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी माझ्या खासगी जीवनातील अनेक बाबी चुकीच्या पद्धतीने अग्रलेखात मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अग्रलेखाविषयी मी नाही तर माझ्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यावर अॅट्रोसिटीअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.’ अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. (journalist arrested in atrocity case see the exact answer of nandurbar district collector)
ADVERTISEMENT