ठाणे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई केली. हैदराबादकडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना त्यांच्याकडे सोन्याच्या बिस्किटांसह कोट्यवधींचं घबाडचं सापडलं.
ADVERTISEMENT
हैदराबादवरू मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यवधी रुपयांची वाहतूक होत असल्याची माहिती रेल्वेच्या आरपीएफ व सीआयबी अधिकार्यांना मिळाली होती. आरपीएफ व सीआयबीच्या पथकाने या माहितीच्या आधारे सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या देवगिरी एक्स्प्रेस मधून पाच संशयितांना ताब्यात घेतलं.
गणेश मरिबा भगत, मयूर वालदास भाई कापडी, नंदकुमार वैध, संजय मनिककामे, चंदू माकणे अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटे जप्त केली.
आरोपींनी आपण कुरियर कंपनीसाठी काम करत असून, कुरियर पोहोचवण्यासाठी आल्याची माहिती दिली तपास यंत्रणांना दिली. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याची तस्करीमागे कोण आहे, याचा पोलीस आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोध घेतला जात आहे.
कधी करण्यात आली कारवाई?
बुधवार (25 मे) नांदेडकडून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसमधून कोट्यावधी रुपयाच्या अवैध मालमत्तेची वाहतूक केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. सीआयबी निरीक्षक सुनील शर्मा, उपनिरीक्षक जीएस एडले, हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचला होता.
आरपीएफचे निरीक्षक प्रकाश यादव आणि तुकाराम आंधळे यांना तीन वेगवेगळ्या बोगी मध्ये ५ जण संशयितरित्या प्रवास करत असल्याचं दिसून आलं. या पाच जणांना सामानासह ताब्यात घेत त्यांच्या सामानाची झडती घेण्यात आली.
एकाच पार्सलमध्ये ९ लाख १४ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं असलेले तीन बॉक्स, तर इतर चौघांच्या पार्सलमध्ये मिळून १ कोटी १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड मिळाली.
‘आपण वेगवेगळ्या कुरियर कंपन्यासाठी नांदेड, औरंगाबाद, परभणीमध्ये काम करत असून, मस्जिद बंदरमधील संबधित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात हे पार्सल पोहोचवण्याचं काम देण्यात आलेलं होतं,’ अशी माहिती पाचही जणांनी पोलिसांना दिली.
पुढील चौकशीसाठी ठाणे आयकर विभागाने या पाचही जणांना ताब्यात घेतले असून, रेल्वेच्या आरपीएफ विभागाने ही रोकड आणि सोनं जप्त केल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.
ADVERTISEMENT