आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्ध इसमाला हिललाईन पोलिसांनी अखेरीस अटक केली आहे. आरोपीचं नाव गजानन बुवा चिकणकर असं आहे. सोशल मीडियावर आपल्या पत्नीला बादलीने आणि हाताने अमानुषपणे मारहाणा करतानाचा गजानन बुवा चिकणकरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर चिकणकरवर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणी होत होती.
ADVERTISEMENT
समाजमाध्यमांमध्ये या प्रकरणावरुन संतप्त प्रतिक्रीया निर्माण व्हायला लागल्यानंतर कल्याण पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली. पत्नीला मारहाण केल्यानंतर चिकणकर हा आळंदीला वारीसाठी गेल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी एक पथक तात्काळ आळंदीला रवाना करत या बुवाला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
घरात पाण्यावरुन झालेल्या वादानंतर ८५ वर्षीय गजानन बुवा चिकणकरने आपल्या पत्नीला मारहाण केली. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. गजानन बुवाच्या १३ वर्षीय नातवाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओत गजानन बुवा आपल्या पत्नीला मारहाण करत असताना घरातला एकही सदस्य त्याला थांबवण्यासाठी पुढे आला.
स्थानिक शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून पीडित पत्नीला पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी मदत करायची तयारी दर्शवली. परंतू पत्नीने तक्रार देण्यास नकार दर्शवला. ज्यानंतर पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत गजानन बुवा चिकणकरला आळंदीतून अटक केली आहे.
ADVERTISEMENT