कर्नाटकमधल्या लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे मठाधीश शिवामूर्ती मुरघा शरानरू यांना लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आलं आहे. रात्री उशिरा त्यांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली. शिवामूर्ती यांच्यावर अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केलं असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शिवामूर्ती मुरघा यांना गुरूवारी रात्री उशिरा अटक
शिवामूर्ती मुरघा यांना गुरूवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी शिवामूर्ती मुरघा यांना गुरूवारी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती दिली. रात्री साडेअकरा नंतर त्यांना चित्रदूर्ग येथील तुरुंगात आणण्यात आलं.
काय आहे प्रकरण?
शिवामूर्ती मुरघा शरानारू यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी मैसूर येथील पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. लैंगिक छळ आणि शोषण केल्याचा आरोप या दोन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर केला होता. त्यानंतर शिवामूर्ती यांच्या विरोधात पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. लिंगायत मठाच्या माध्यमातून सुरू असलेल्या शाळेत या दोन मुली शिकत होत्या. १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ या दरम्यान शिवामूर्ती यांनी या दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केलं. तसंच त्यांचा छळही केला. या मुलींनी दिलेल्या तक्रारीत ही बाब नमूद करण्यात आली आहे. ANI या वृत्तसंस्थेने शिवामूर्ती यांना अटक केल्याची माहिती दिली आहे.
लैंगिक शोषण आणि छळाला कंटाळून मुलींनी मठातून काढला पळ
सतत होणाऱ्या लैंगिक छळाला आणि शोषणाला कंटाळून लिंगायत मठातून या मुलींनी पळ काढला होता. कोट्टनपेट पोलीस ठाण्यात या मुली आधी गेल्या होत्या. तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या मुलींना मदत केली. त्यानंतर मैसूर येथील नाझारबाद पोलीस ठाण्यात शिवामूर्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT