महाराष्ट्रापाठोपाठ पावसाने केरळाला तडाखा दिला असून, राज्यातील अनेक भागात प्रचंड नुकसान झालं आहे. केरळातील काही जिल्ह्यांत भूस्खलन आणि महापुरांमुळे हाहाकार उडाला असून, आतापर्यंत यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
केरळात पावसाचं तांडव सुरु असून, मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागातील जनजीवन ठप्प झालं आहे. पावसामुळे परिस्थिती पूर्णपणे कोलमडली असून, आतापर्यंत भूस्खलन आणि इतर घटनांमध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण बेपत्ता आहेत.
केरळात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला असून, मीनाचल आणि मनीमाला नद्यांनी रौद्रवतार घेतला आहे. पुरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
दक्षिण आणि मध्य केरळला शनिवारी जोरदार पावसाने तडाखा दिला. पूर आणि दरडींच्या घटनांत 21 जणांवर मृत्यू ओढवला आहे. कोट्टयम, इडुक्की जिल्ह्यांच्या सीमेवरील पर्वतीय भागांतील दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.
पूर आणि पावसाने जोर धरल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यामुळे राज्य सरकारने बचावकार्यासाठी लष्कर, हवाई दलाची मदत घेतली आहे.
कोट्टयम व इडुक्की जिल्ह्य़ांतील अनुक्रमे कूट्टिक्कल व पेरुवंतनम या दोन पर्यवतीय भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या. कोट्टायम आणि इडुक्की येथे गेल्या काही वर्षातील तुलनेत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
दक्षिण आणि मध्य केरळला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून, याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे.
केरळातील कोट्टायम जिल्ह्यात 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इडुक्की जिल्ह्यात आठ मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, दक्षिण आणि मध्य केरळातील पुरपरिस्थिती अजूनही गंभीर आहे.
शनिवारी झालेल्या पावसामुळे 2018-19 मध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसारखीच स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जनजीवन प्रभावित झालं असलं तरी प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र राज्यातील पुरपरिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचं मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटलं आहे.
पाऊस आणि पुराच्या तडाख्याने कोलमडलेल्या दक्षिण व मध्य केरळाला हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सध्या घेतला जात असून, पुरात अडकलेल्यांसाठी मदत पाठवण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे मीनाचल आणि मनीमाला या नद्यांनी रौद्रवतार धारण केला असून, नदीपात्रातील पाणीपातळी ४० फुटांपेक्षा जास्त वर गेली आहे.
दक्षिण व मध्य केरळातील अनेक धरणं तुडूंब भरण्याच्या स्थितीत असून, पाणी सोडल्यास पुन्हा परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाऊस आणि पुरामुळे अनेक ठिकाणी नद्यांवरील पुल वाहून गेले आहेत. त्यामुळे गाव व वस्त्यांशी संपर्क तुटला आहे. विशेषतः डोंगराळ भागातील गाव संपर्काबाहेर गेली आहेत.
केरळात निर्माण झालेल्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी आता लष्कर, एनडीआरएफ, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांची मदत घेतली जात आहे.
एमआय-१७ आणि सारंग या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत घेतली जात आहे. तर चिंतेची बाब म्हणजे कोट्टायम जिल्ह्यात अद्यापही हवामान खराब असून, मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
केरळात भुस्खलन व पूर परिस्थितीमुळे 21 जणांचा मृत्यू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढाव घेतला असून, सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT