कोल्हापुर : हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या नावाखाली देशभरातील सुमारे दीड हजार स्पर्धकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम या राज्यातील स्पर्धकांचा फसवणूक झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिसांनी या स्पर्धेचा मुख्य आयोजक वैभव पाटील याच्यासह इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरमधील शाहूपुरी इथं वैभव पाटील या तरुणानं ‘मराठा कमांडो सिक्युरिटी इंटलिजेन्स मॅन पॉवर्स फोर्स’ या कंपनीच्या नावानं वेबसाईटवर हाफ मॅरेथॉनची माहिती टाकली होती. या जाहिरातीमध्ये एमसीएसएफ वेल्फअर फौंडेशन, कमांडो हाफ मॅरेथॉन २०२२ असा उल्लेख करण्यात आला होता. १६ ऑक्टोबर रोजी तपोवन इथून या स्पर्धेला सुरूवात होणार असल्याचंही म्हटलं होतं.
या जाहिरातीमध्ये स्पर्धेच्या नियम आणि अटींमध्ये २१, १०, ५ आणि ३ किलोमीटर या अंतराची स्पर्धा होणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच सहभागी होण्यासाठी प्रत्येकी १५०० ते २ हजार रूपये फी आकारण्यात आली. जाहिरातीच्या शेवटी वेगवेगळया गटातील विजेत्यांना ३० लाख रूपयांची बक्षिसं दिली जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. आकर्षक बक्षिसाच्या रकमेमुळे जाहिरात सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली.
त्यावरून महाराष्ट्राच्या विविध भागातील मॅरेथॉनपटूंसह दिल्ली, बिहार, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम या राज्यातील मॅरेथॉनपटूंनी सहभाग घेतला.अशा प्रकारे जवळपास ९०० स्पर्धकांची नोंदणी या फौंडेशनकडं झाली. स्पर्धेच्या एक दिवस आधी सर्व स्पर्धक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी राहण्यासाठी लॉज, यात्री निवास बुक केले. तसंच टाकाळा इथल्या व्ही.टी. पाटील सांस्कृतिक भवनाच्या मैदानावर हे स्पर्धक दिवसभर थांबून राहिले.
मात्र सायंकाळपर्यंत यातील काहींना फक्त टी-शर्ट आणि स्पर्धेसाठी चिप उपलब्ध झाली. त्यानंतर संयोजकांचे फोन स्वीच ऑफ झाले. त्यांच्याकडून कोणत्याचं हालचाली होतं नसल्यानं, सायंकाळी मात्र स्पर्धकात संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यानंतरआपली फसवणूक झाल्याचं स्पर्धकांच्या लक्षात आलं. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
याप्रकरणी वैभव पाटीलच्या संपर्कातील लोकांना स्पर्धकांनी धारेवर धरलं. राग व्यक्त करत, स्पर्धेच्या फीसाठी भरलेली रक्कम, येण्याजाण्याचा खर्च दयावा अशी मागणी केली. यानंतर पोलिसांनी वैभव पाटील याच्या पत्नीला ताब्यात घेवून, शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं. तिथंही स्पर्धकांनी गर्दी केली होती. या फसवणुकीसंदर्भात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू होतं.
ADVERTISEMENT