कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीला नाराजीनाट्याचा सामना करावा लागतो आहे. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना रिंगणात उतरवायचं ठरवल्यानंतर माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही निवडणुकीची तयारी केली होती. परंतू पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माघार घेण्याचे आदेश दिल्यानंतर जय्यत तयारी केलेल्या क्षीरसागरांना आपली तलवार म्यान करावी लागली. परंतू रविवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात क्षीरसागरांनी आपली नाराजी बोलून दाखवत महाविकास आघाडीत सारंकाही आलबेल नाही हेच दाखवून दिलंय.
ADVERTISEMENT
माघार घेण्याचे आदेश आल्यानंतर क्षीरसागर दोन दिवस नॉट रिचेबल होते. त्यातच कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्याला पाठ फिरवत क्षीरसागर यांनी स्वतःचा वेगळा कार्यक्रम घेत आपल्या समर्थकांच्या साथीने शक्तीप्रदर्शन करत नाराजी बोलून दाखवली. “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही नेत्यांमुळं, २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघात माझा पराभव झाला. त्याच कॉंग्रेससाठी शिवसेनेला आता मतदार संघ सोडावा लागणं दुर्दैवी आहे”, असं क्षीरसागर म्हणाले.
आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार प्रत्यक्षात लाभ घेतंय पवार सरकार- शिवसेना खासदार गजानन किर्तीकर
परंतू आपली नाराजी बोलून दाखवताना क्षीरसागर यांनी पक्षप्रमुखांचा आदेश आपल्यासाठी व शिवसैनिकांसाठी अंतिम आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करत राहू असंही जाहीर केलं.
कोल्हापूर उत्तरचा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना उमेदवारी डावलल्यानं, माजी आमदार राजेश क्षीरसागर चांगलेच नाराज आहेत. त्यातून गेले दोन दिवस ते नॉटरिचेबल होते. ज्यानंतर रविवारी संध्याकाळी ते कोल्हापुरात आले. परंतू महाविकास आघाडीच्या मेळाव्याला न जाता त्यांनी सायंकाळी शनिवार पेठेतील शिवसेनेच्या शहर कार्यालयासमोर समांतर मेळावा घेऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसंच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हयातील नेत्यांबद्दल नाराजीही व्यक्त केली. यावेळी अनेक शिवसैनिकांनीही तीव्र भावना व्यक्त करत मनातील खदखद व्यक्त केली. कसबा बावडयातील नेत्याची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक रिंगणात उतरावं, असा थेट आग्रह शिवसैनिकांनी धरला.
त्यानंतर राजेश क्षीरसागर यांनी भूमिका मांडली. ज्या काँग्रेस पक्षानं शिवसेनेचे जिल्हयातील पाच आमदार पाडले, त्या पक्षासाठी कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेनेला सोडावी लागते, हे दुर्दैवी आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही राक्षसी महत्वाकांक्षेच्या नेत्यांनी षडयंत्र रचून आपला पराभव केला, असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
गेल्या अडीच वर्षात कोटयवधी रूपयांचा निधी खेचून आणून, शहरात विकासकामं केली. कोल्हापूर उत्तर मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तिरंगी लढत झाली असती, तर काँग्रेसला शिवसेनेची ताकद दाखवून दिली असती, असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेमुळंच गोकुळमध्ये दोन्ही काँग्रेसची सत्ता आली. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याचा विसर पडला. केडीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजपला सोबत घेऊन शिवसेनेला का डावललं, याचं उत्तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलं पाहीजे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला जमेत धरत नाहीत. अशीच परिस्थिती राहीली, तर शिवसैनिकांना न्याय कधी मिळणार, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : राजू शेट्टींचं मन वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न
ADVERTISEMENT