पोलीस असल्याची बतावणी करुन लुबाडणाऱ्या इराणी टोळीतील तिघांपैकी एकाला कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी अटक केला आहे. याचसोबत इतर दोन साथीदारांचाही पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
पोलीस असल्याची बतावणी करून, महापालिकेतील कर्मचार्यांना लुबाडण्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील रंकाळा तलावासमोरच्या डी मार्टजवळ घडली होती. हे काम इराणी टोळीनं केलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून राजवाडा पोलीस त्या भामटयांच्या मागावर होते. अखेरीस मंगळवारी इंदिरा सागर हॉटेल परिसरात संशयित आरोपी आढळल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. अखेर तिघांपैकी एका भामट्याला पकडण्यात राजवाडा पोलिसांना यश आलं. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यानं अशाप्रकारे २३ गुन्हे केल्याची कबुली दिली.
अटक केलेल्या आरोपीचं नाव शब्बीर जाफरी असं असून तो लोणी काळभोरचा रहिवासी आहे. त्याचे दोन साथीदार पळून गेले आहेत. आरोपीकडे सापडलेल्या बॅगमध्ये धातुचे आणि स्टिलचे कडे, खोटया अंगठया, चेन अशा वस्तू आढळल्या. शब्बीरच्या दोन साथीदारांचा मिरज-सांगली भागात शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT