राणे-नाईक संघर्षात काँग्रेसला कशी लागली ‘लॉटरी’?

मुंबई तक

• 02:07 AM • 15 Feb 2022

–भरत केसरकर, सिंधुदुर्ग कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा वरचष्मा बघायला मिळाला. दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसच्या पदरात नगरसेवक पद टाकत वैभव नाईकांनी नारायण राणेंना आणि पर्यायाने भाजपला शह दिला. त्यांच्या या राजकीय खेळीची आता चर्चा सुरू आहे. राणे-नाईक राजकीय संघर्षात काँग्रेसला मात्र लॉटरी लागली. या निवडणुकीच्या निमित्ताने कुडाळ-मालवण मतदारसंघ आणि वैभव नाईक-नारायण राणे […]

Mumbaitak
follow google news

भरत केसरकर, सिंधुदुर्ग

हे वाचलं का?

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचा वरचष्मा बघायला मिळाला. दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसच्या पदरात नगरसेवक पद टाकत वैभव नाईकांनी नारायण राणेंना आणि पर्यायाने भाजपला शह दिला. त्यांच्या या राजकीय खेळीची आता चर्चा सुरू आहे. राणे-नाईक राजकीय संघर्षात काँग्रेसला मात्र लॉटरी लागली. या निवडणुकीच्या निमित्ताने कुडाळ-मालवण मतदारसंघ आणि वैभव नाईक-नारायण राणे यांच्यातील आतापर्यंतच्या संघर्षाचा घेतलेला हा धावता आढावा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे कुडाळ! कुडाळ-मालवण मतदारसंघातून नारायण राणे यांनी २००९ मध्ये पहिल्यांदा तब्बल २५ हजार मतांनी विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेल्या वैभव नाईक यांना राणेंनी धूळ चारली होती. मात्र नंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली. ऑक्टोबर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा १० हजार मतांनी पराभव केला आणि जायंट किलर ठरले.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर वैभव नाईक यांची महाराष्ट्राभर चर्चा झाली. दुसरीकडे नारायण राणे यांच्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का या मतदारसंघात बसला होता. नंतर २०१६ मध्ये झालेल्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने ९ नगरसेवक निवडून आणत एक हाती सत्ता मिळवली. त्यावेळी शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले होते. भाजपला एक, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. असं पक्षीय बलाबल असताना पहिल्या टर्ममध्ये काँग्रेसचे विनायक राणे नगराध्यक्ष झाले, तर दुसऱ्या टर्ममध्ये ओमकार तेलींना नगराध्यक्ष पद मिळालं होतं.

मागील नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा झालेला पराभव हा स्थानिक आमदार वैभव नाईक आणि तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या जिव्हारी लागला होता. नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती झाली. नितेश राणे यांना कणकवलीतून तिकीट मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रात युती होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अशी लढत बघायला मिळाली. कणकवली मतदारसंघातून नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत यांनी बंडखोरी करत नितेश राणे विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणं बदलली. कुडाळमध्ये आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले रणजित देसाई यांनी बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली, तर सावंतवाडीमध्ये तत्कालीन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांनी शड्डू ठोकत निवडणूक लढवली होती.

वैभव नाईक विरुद्ध रणजित देसाई चुरशीची लढत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाली. जिल्हा परिषदेचे गटनेते आणि माजी अध्यक्ष रणजित देसाई यांनी अपक्ष निवडणूक लढवत वैभव नाईक यांना यांना चांगलीच लढत दिली. वैभव नाईक १५,००० हजार मतांनी विजय झाले खरे, पण भाजपचे चिन्ह रणजित देसाई यांना मिळाले असते तर निकाल आणखी वेगळा दिसला असता, असं त्यावेळी जाणकारांचं मत होतं.

दोन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या वैभव नाईक यांना २०१६ नंतर नगरपंचायत निवडणुकीत विजयाने हुलकावणी दिली होती. त्यावेळी आमदार वैभव नाईक, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत या सगळ्यांनी एकजूट दाखवत ताकत लावली, पण नगरपंचायत जिंकता आली नाही. त्यावेळी नारायण राणे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी नगरपंचायती निवडणुकीतून दबदबा सिद्ध केला होता. २०१६ मध्ये या नगरपंचायतीची स्थापना झाली आणि सुरुवातीची निवडणूक नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये असताना जिंकली होती.

२०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली, मात्र स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसनं ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आणि तब्बल दहा जागांवर उमेदवार उभे केले. यामध्ये काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळवता आला. शिवसेना सात आणि कांग्रेस 2 असं बहुमताच्या दृष्टीने मॅजिक फिगर या दोन्ही पक्षांनी गाठली होती. दुसरीकडे भाजपने आठ जागा पटकावत नंबर एकचा पक्ष बनवण्याचा मान मिळवला खरा, पण केवळ एक नगरसेवक कमी असल्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहावं लागलं.

काँग्रेसने निकालाच्या दिवसापासूनच आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत नगराध्यक्षपद जो पक्ष देईल त्याला साथ देऊ, अशी घोषणा केल्यानं सहाजिकच नारायण राणेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी खेळी करत काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेतलं. केवळ दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं. आगामी राजकारणाची गणित लक्षात घेऊन वैभव नाईक यांनी भाजपला सत्तेपासून दूर नगरपंचायत ताब्यात घेतली आहे.

या निवडणुकीत भाजपकडून निलेश राणे मैदानात उतरले होते. २०२४ तयारी लक्षात घेऊन निलेश राणे यांनी ही महत्त्वाची नगरपंचायत प्रतिष्ठेची केली. मात्र, २०१४ मध्ये निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे आता निश्चित झालं आहे. नगरपंचायत निवडणुकीत नारायण यांचे विश्वासू साथीदार आणि निलेश राणे यांचे कट्टर समर्थक असलेले आनंद शिरवलकर यांच्या सौभाग्यवतींना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. मात्र, वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना कुडाळच्या सत्तेपासून दूर ठेवण्यात बाजी मारली. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनिमित्त झालेल्या राजकारणाचे परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

    follow whatsapp