मुंबई: ‘ही शान कोणाची… लालबागच्या राजाची’, हा जयघोष यंदा पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. कारण यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लालबागचा राजा मंडळा’ने (Lalbaugcha Raja) एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी कोरोनाचं (Corona) संकट लक्षात घेऊन लालबाग मंडळाने राजाची प्राणप्रतिष्ठापना केली नव्हती.
ADVERTISEMENT
त्यावेळी राज्यात कोरोनाची भीषण परिस्थिती होती. त्यामुळेच अशा स्वरुपाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यंदा पुन्हा एका राजा लालबागमध्ये विराजमान होणार आहे. म्हणजेच यंदा लालबागचा राजा मंडळ गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करणार आहे. तशा स्वरुपाचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे.
याबाबत लालबागचा राजा मंडळाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, ‘यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव साजरा करणार आहे. शासन नियमानुसार यावर्षी बाप्पाची मूर्ती ही चार फुटांची असणार आहे.’
मागील वर्षी कोरोनाचं भीषण संकट हे महाराष्ट्रवर ओढावलं होतं. ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्बंध हे गणेशोत्सावर घालण्यात आले होते. त्यामुळे लालबागचा राजा मंडळाने आपल्या येथे होणारी गर्दी आणि त्यामुळे ओढणावरं संभाव्य संकट लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
याऐवजी त्यांनी ‘आरोग्य उत्सवाचं’ आयोजन केलं होतं. पण यंदा मात्र गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यावेळी शासनाचे सर्व नियम व अटी पाळून उत्सव साजरा केला जाईल असं मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यामुळे यंदा आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचं दर्शन भाविकांना होणार आहे. शासन नियमाप्रमाणे लालबागच्या राजाची मूर्ती चार फुटाचीच असणार आहे. याशिवाय मंडळाकडून गणेशोत्सव साजरा करण्यातबाबत आता विशिष्ट पद्धतीने आखणी करण्यात येत आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी उसळते. त्यामुळे आता हा उत्सव साजरा करताना मंडळावर कोरोना नियमांचं पालन करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी भाविकांना दर्शन कशा स्वरुपात मिळणार याबाबत नेमकी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसात योग्य आराखडा तयार करुन त्याबाबतची माहिती दिली जाऊ शकते.
Corona : सार्वजनिक गणेश उत्सवातल्या मूर्तीला 4 फुटांची मर्यादा, नवी नियमावली जाहीर
लालबागचा राजा मंडळाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
‘लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विशेष सर्वसाधारण सभेत महत्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेतला गेला. आध्यात्मिक ऊर्जा व सामाजिक भान राखून ‘माझा गणेशोत्सव, माझी जबाबदारी’ या संकल्पनेला अनुसरून सर्व पावित्र्य राखत आणि शासन निर्णयानुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
‘गेल्या वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव पाहता अन त्याचे रौद्र रूप लक्षात घेता शासनाच्या विनंतीला मान देऊन रक्तदान, प्लाझ्मा दान यासारखा आरोग्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, यंदा भाविकाची भावना लक्षात घेऊन पूर्णपणे कोरोना नियमाचं पालन करुन यंदाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.’ अशी माहिती मंडळाकडून यावेळी देण्यात आली आहे.
पाहा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी काय आहे शासनाची नियमावली:
-
सार्वजनिक गणेश उत्सवासाठी गणेश उत्सव मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे
-
कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारले जावेत. यावर्षीचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने आणि करणे अपेक्षित आहे तसंच घरगुती गणेश उत्सवही साधेपणानेच साजरा करण्यात यावा.
-
श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट उंच व घरगुती गणपतीसाठी 2 फूट उंची मर्यादित असावी
-
यावर्षी पारंपरिक गणेश मूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची म्हणजेच पर्यावरणपूरक असेल तर त्याचे विसर्जन घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसेल तर नजिकच्या कृत्रीम विसर्जन तलावाच्या स्थळी जाऊन विसर्जन करावं
-
उत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिली गेली तर त्याचा स्वीकार करावा, जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे, आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी
-
सार्वजनिक गणेश उत्सवांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी, आरोग्य विषयक शिबिरं उदाहरणार्थ रक्तदान शिबीरं, आयोजित करण्यास प्राधान्य द्यावं. कोरोना, डेंग्यू, मलेरिया इतर आजार यांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करावी.
ADVERTISEMENT