Mumbai Rain : माहुल दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर, घराची भिंत कोसळून झाला अपघात

मुस्तफा शेख

• 02:27 AM • 18 Jul 2021

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसायला सुरुवात झाली आहे. चेंबूर परिसरातील माहुल भागात एका बैठ्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारत नगर, वंजार दांडा भागात ही घटना घडली आहे. रात्री १ वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे झाड घरावर कोसळून ही […]

Mumbaitak
follow google news

शनिवारी रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईला बसायला सुरुवात झाली आहे. चेंबूर परिसरातील माहुल भागात एका बैठ्या घराची भिंत कोसळून मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारत नगर, वंजार दांडा भागात ही घटना घडली आहे. रात्री १ वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे झाड घरावर कोसळून ही भिंत पडल्याचं प्राथमिक माहितीतून समजतंय.

हे वाचलं का?

सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान या घटनेबद्दलची माहिती मिळताच, अग्नीशमन दल आणि NDRF ची टीम घटनास्थळी पोहचली. यात जखमी झालेल्या १९ जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात येत आहे. परंतू या घटनेनंतर मुंबईतील दरड क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या जीवाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

Mumbai Rain : रात्रभर मुसळधार पावसामुळे मुंबईची ‘तुंबई’, पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहणार

घटनास्खळी अग्नीशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य अद्याप सुरु आहे. भिंत कोसळून तयार झालेल्या ढिगाऱ्याखाली काही जणं अजून अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी एनडीआरएफने डॉग स्कॉडची मदत घेत रेस्क्यु ऑपरेशन सुरु ठेवलं आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Mahul Landslide : भिंत खचली, चूल विझली! जेव्हा पाऊस काळ बनून येतो..

दरम्यान एकीकडे माहुल भागातली घटना ताजी असताना विक्रोळी परिसरातही ४-५ झोपड्या पडून जिवीतहानीची बातमी समोर येते आहे. विक्रोळी पश्चिम परिसरातील सूर्यनगर भागात भूस्खळनामुळे ४-५ झोपड्या पडून सात जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मध्यरात्री पावणेतीन वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेत जखमींना राजावाडी रुग्णालयात आणलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे दादर, लालबाग, परळ, दक्षिण मुंबईतील महत्वाची ठिकाणं, भांडूप, चिंचपोकळी या भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह होती की रस्त्यांना अक्षरशः नदीचं रुप आलंय. अनेक चारचाकी वाहनंही या पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडली आहेत. पुढचे ३ तास शहरात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.

    follow whatsapp