भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मंगळवारी कोरोना संसर्ग झाला. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत मात्र त्यांचं वय 92 असल्याने खबरदारी म्हणून त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर या पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर येताच आणि त्यांना आयसीयूमध्ये ठेवल्याचं कळताच चाहते त्यांना आराम मिळावा म्हणून प्रार्थना करू लागले आहेत. आज त्यांची प्रकृती कशी आहे याबाबत त्यांची भाची रचना शहा यांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
रचना शाह यांनी सांगितलं आहे की लतादीदींची प्रकृती सध्या सुधारते आहे. काही दिवस त्यांना रूग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. कोरोना संसर्ग झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. त्यांच्या प्रायव्हसीचा सगळ्यांनी आदर राखावा अशी विनंतीही रचना शाह यांनी केली आहे.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चौकशी केली. तसंच गरज पडल्यास मीदेखील रूग्णलयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करेन असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना कोरोनासोबतच निमोनियानेही ग्रासलं आहे. इ टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह, आयसीयूमध्ये दाखल
लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करते आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी निमोनिया झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र मंगळवारी त्यांना कोरोना झाल्याची बातमी समोर आली. प्रत्यक्षात त्यांना शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील प्रोफेसर डॉ. प्रतीत समदानी गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर यांची काळजी घेत आहेत. त्यांनी खुलासा केला आहे, की त्यांना शनिवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना शनिवारी रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्यांना कोरोनासोबतच निमोनिया झाल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु यापुढे त्यांनी दिदीची कोणतीही हेल्थ अपडेट दिलेली नाही. एका मीडिया रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांना आपल्या एका कर्मचाऱ्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली होती. तो लता मंगेशकर यांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
ADVERTISEMENT