Vidhan Parishad Election 2023 Constituency: मुंबई: राज्यातील शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची बहुचर्चित निवडणूक (Teacher-Graduate Legislative Council Election) ही 30 जानेवारीला होणार आहे. यात नाशिकच्या (Nashik) पदवीधर मतदारसंघाने तर रंगतच आणली आहे. अगदी 6-7 महिन्यांपूर्वीच राज्यात झालेल्या विधान परिषद (Vidhan Parishad) निवडणुकीतच सत्तांतराची पेरणी झाली होती. आताही असं काही होईल याचा आम्ही दावा करत नाही, पण निवडणुकीतील घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं कुणाविरोधात कोण उभे आहेत, कोणत्या मतदारसंघात कोणत्या लढती आहेत हे आपण सविस्तर समजून घ्या. (Legislative Council Elections 2023: Who Will Contest Against Whom in Five Constituencies?)
ADVERTISEMENT
नाशिक पदवीधर मतदारसंघ
सगळ्यात आधी आपण नाशिक पदवीधर मतदार संघाबाबत जाणून घेऊया. कारण तिथे ऐनवेळेला उलटफेर झाला आहे. 11 जानेवारीला विद्यमान आमदार सुधीर तांबे घोषणा करतात की ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज भरणार. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी सुधीर तांबेंचे पुत्र सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. AB फॉर्म त्यांना काँग्रेसचा काही मिळाला नाही.
नाशिकमध्ये भाजपचा किंवा भाजप पुरस्कृत म्हणून कुणी उमेदवार मैदानात नाही. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या पॉवरफुल उमेदवार म्हणून सत्यजित तांबेंकडेच पाहिलं जात आहे. त्यात त्यांनी इतर पक्षांकडेही पाठिंबा मागितला आहे.
भाजपचेचे नगर जिल्ह्यातून येणारे मातब्बर नेते विखे-पाटलांनी तर आधीच म्हटलं आहे की सत्यजित तांबे भाजपच्या उमेदवारीवर लढले तर स्वागतच आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांचा विधिमंडळाचा मार्ग हा मोकळा झाला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त धनराज विसपुते (अपक्ष) आणि धनंजय जाधव (अपक्ष) हे ही रिंगणात आहेतच.
विधान परिषद निवडणूक 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?
नागपूर शिक्षक मतदारसंघ
खरं तर विधान परिषद निवडणूक लागल्यापासून शिंदे किंवा ठाकरेंच्या वाट्याला काय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. शिंदेंच्या वाट्याला तर काही आलं नाही, पण ठाकरेंना मात्र एक जागा मिळाली, ती आहे नागपूरची. नागपूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गंगाधर नाकाडे यांना मैदानात उतरवलं आहे.
गंगाधर नाकाडे हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग अध्यक्ष आहेत. नाकाडे यांच्या विरोधात विद्यमान आमदार नागो गाणार लढतीत आहेत, आणि त्यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निमित्ताने एकप्रकारे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगेल.
अमरावती पदवीधर मतदारसंघ
महाविकास आघाडीमध्ये अमरावतीची जागा काँग्रेसने मिळवली आहे. विदर्भात सहसा पाहायला मिळते तीच काँग्रेस विरुद्ध भाजपची लढत आहे. काँग्रेसकडून धीरज लिंगाडे आणि त्यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे धीरज लिंगाडे यांनी 10 जानेवारीला शिवसेना (UBT) पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अमरावती पदवीधरसाठी शिवसेना (UBT) पक्षाने दीड वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती. यासंदर्भात पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांना पक्षाच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाचं पत्र पाठविलं होतं. यात निवडणुकीची पूर्वतयारी, पदवीधर मतदार नोंदणी, बैठका अशी सर्व जबाबदारी धीरज लिंगाडे यांच्याकडे दिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे धीरज लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र आता धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत.
समजून घ्या: शिक्षक-पदवीधर विधान परिषदेची निवडणूक का आणि कशी होते?
कोकण शिक्षक मतदारसंघ
कोकणात बाळाराम पाटील जे शेकापचे विद्यमान आमदार आहेत, त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे आणि महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आणि त्यांच्याविरोधात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे लढतीत आहेत. खरं तर कोकणातली जागा ही शिंदे गटाला जाईल असे कयास बांधले जात होते, मात्र ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिंदे गटाचेच अशी सारवासारव भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
म्हात्रेंचा अर्ज दाखल करताना शिंदे गटाचेही मंत्री उपस्थित होते. भाजपचे नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबतच, मंत्री उदय सामंत, आणि मंत्री दीपक केसरकर अर्ज दाखल करण्यावेळी उपस्थित होते.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. अनेक वर्षे त्यांचाच उमेदवार निवडून येतो आहे. विवेक काळे यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीने उमेदवारी देत शक्तीप्रदर्शन करत त्यांचा अर्ज भरला.
मविआचा पाठिंबा म्हणून सेनेचे नेतेही त्यावेळी दिसून आले. अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादीला शह द्यायला भाजपने आयात उमेदवार रिंगणात उतरवलाय. विवेक काळेंच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपत आलेले किरण पाटील मैदानात आहेत.
आता या पाचही मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार आणि या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात काही नवीच समीकरणं जुळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT