–स्मिता शिंदे, जुन्नर
ADVERTISEMENT
जुन्नर तालुक्यातील रस्त्यांवर किंवा शेतात अचानक बिबट दिसणे हे नित्याचं झालं आहे. याच्या बातम्या होणं हेही नित्याचंच. बिबट्या समोर येणं हे तालुक्यातील नागरिकांसाठी सामान्य गोष्ट बनली आहे. मात्र, अंगावर शहारा आणणारी एक घटना घडली आहे. 2 बिबट्यांची झुंज झाली आणि त्यात एका बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष बघितला.
आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथे शुक्रवारी (17 डिसेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास दोन बिबट्यांची झुंज झाली. शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथील शेतशिवारात स्थानिक शेतकरी उत्तम लाड यांनी दोन बिबट्यांची झुंज पहिली. या घटनेत एका लहान अडीच ते तीन वर्षांच्या मादीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. तसेच पोट, मान व पायाचे लचके बिबट्याने तोडल्याचंही दिसून आलं. या झुंजीनंतर दुसऱ्या बिबट्याने शेजारच्या उसात धूम ठोकली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डी.बी वाळुंज घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. यावेळी त्याच्या समवेत बारकु गडगे, सुहास गडगे, संतोष गडगे, उद्धव लाड, उत्तम लाड उपस्थित होते.
दरम्यान, जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना परिसर अपुरा पडू लागला आहे. त्यातच उसाची तोडणी सुरु आहे. अशावेळी बिबट्या आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी इतर बिबट्यांशी लढतात. ही घटनादेखील याच प्रकारची असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT