महाराष्ट्राची एकसष्टी साजरी करत असताना माझ्यासारख्या नव्वदी ओलांडलेल्या माणसाला हे सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीचे आम्ही भागीदार आहोत. त्या साऱ्या घटना आजही मला आठवतात. त्या स्थापनेच्या वेळी आम्ही केलेला संकल्पही आठवतो. १ मे हा फक्त महाराष्ट्र दिन नाही. तर १ मे हा जागतिक कामगार दिवसही आहे. अशावेळी आजच्या काळात एका रोगाने दुनियेला ग्रासलं आहे. त्या रोगाचं नाव आहे कोरोना. आमचं राज्य, आमचं सरकार त्रासलंय, मात्र आमचं राजकारण इतकं नासलंय की काय बोलावं? असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत बाबा आढाव यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ज्या अभिमानाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही घेतो त्याच अभिमानाने आम्हाला या रोगाशी लढण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे, आम्हालाही उभं राहिलं पाहिजे. मात्र आज जगाकडे प्राणवायू मागायची वेळ आपल्यावर आली आहे. राजकारण नासलेलं असलं तरी आत्ताच्या तरूण पिढीपुढे ते आव्हान आहे. शेतकऱ्यांचं, सामान्यांचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प मराठी माणसाने केला. पण आज शेतकऱ्यांची स्थिती काय आहे? कामगारांचे स्थिती काय आहे? तरीही आम्ही स्वस्थ बसणार नाही. या संकटावर मात करून दुनियेसोबत आम्ही कोरोनाशी लढा देऊच. नवी दुनिया, नवा देशा, नवा महाराष्ट्र आम्ही निर्माण करू असा विश्वास आम्हाला वाटतो. महाराष्ट्र दिनी माझ्या तरूण बांधवांना हेच सांगायचं आहे की स्वतःला फसवू नका.
माय मराठी कुठे आहे? बालवाडीतून मराठी नाही, माँटेसरीतून इंग्रजी आम्ही शिकवतो आहे. ही जी फसवणूक आपण करतो आहोत ना स्वतःची त्यावर 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी सामुदायिक चिंतन झालं पाहिजे. महाराष्ट्र एकसंध राहिला आहे, बेळगावचा प्रश्न कायम आहे… भारतात भरभराट आहे. प्रगती होते आहे मग गाडा अडलाय कुणामुळे? तर लक्षात घ्या तो नासलेल्या राजकारणामुळे अडलाय. तरूणांनी पुढे आलं पाहिजे, या तरूणाने पुढे येऊन नवा महाराष्ट्र घडवावा असं आवाहन मी करतो. तसंच या कोरोना रोगाच्या सावटाखालून आपण नक्की बाहेर येऊ असा विश्वासही मला आहे. असंही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
