अवघ्या देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलं होतं ती निवडणूक म्हणजे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक. पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. मात्र पश्चिम बंगालचा सामना ममतादीदी विरूद्ध नरेंद्र मोदी असा होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपने त्यांची सगळी ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. असं असलं तरीही भाजपला ममता बॅनर्जींना पराभवाची धूळ चारता आली नाहीच. ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्या वेळी तृणमूलला विजय मिळवून दिला आणि आपली खुर्ची राखण्यात यश मिळवलं. या सगळ्याबाबत मुंबई तकने लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी संवाद साधला. आज तक आणि मुंबई तकचे एक्झिक्युटिव्ह एडिटर साहिल जोशी यांनी गिरीश कुबेरांशी संवाद साधला. या निवडणूक निकालाचं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी कसं केलं आहे वाचा
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता बॅनर्जीच होणार मुख्यमंत्री-संजय राऊत
1)बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षित की अनपेक्षित?
गिरीश कुबेर : बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आकार अनपेक्षित आहे पण निकाल मुळीच अनपेक्षित म्हणता येणार नाही. कारण भाजपचं यश हे निवडणूकपूर्व वातावरण निर्मितीमधे असतं हे आपण गेली अनेक वर्षे बघत आहोत. भाजपचे लोक अशा पद्धतीने धुरळा उडवतात की समोरच्याला डोळ्याने काही दिसेनासं होतं आणि भाजपचे लोक सांगतात हे खरं वाटू लागतं. प्रचारमाध्यमं आणि प्रसारमाध्यमं हाताशी असल्याने ते असं सहज करू शकतात. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींना जे यश मिळालं त्या यशाचा आकार हा निश्चितच सुखद धक्कादायक आहे. 2016 इतक्याच जागा त्यांना मिळत आहेत. ममता बॅनर्जींनी त्यांची मतदारासंघांवरची पकड निश्चित केली आहे.
2) तुम्ही असं म्हणालात की भाजपचा प्रचारच असा असतो की धुरळा उडतो आणि त्यातून काही दिसत नाही पण याचा फायदा त्यांना झाला आहे. लोकसभेत आपण ते पाहिलं आहे. विधानसभेत हेच मॉडेल त्यांनी वापरलं.अनेक दिग्गजांना त्यांनी या निवडणुकीत लावली होती. त्यादृष्टीने हा निकाल त्यांच्यासाठी अनपेक्षित वाटत नाही का?
गिरीश कुबेर: तेच तर वैशिष्ट्य आहे, म्हणजे भाजपने कमालीची ताकद, कमालीचा असहिष्णुता वाद आणि एकंदर कमालीचं नियंत्रण यंत्रणेवर असूनही सामान्य मतदार या सगळ्याला न जुमानता त्याला हवं ते करतो हे फार महत्वाचं आहे. यातला अधोरेखित असा अर्थ समोर येतो तो म्हणजे भाजपकडे जेव्हा राज्यांच्या निवडणुका येतात तेव्हा नरेंद्र मोदी सोडले तर दुसरं नेतृ्त्व नाही. नेतृत्वाचा चेहरा नसणं हे सगळ्यात मोठं अपयश पुन्हा एकदा भाजपसाठी ठरतं आहे. हे सातत्याने दिसूनही येतं आहे बिहार, छत्तीसगढ, राजस्थान, बंगाल या सगळीकडे दिसून आलं आहे. मध्यप्रदेशात त्यांनी नंतर सत्ता मिळवली. तामिळनाडू आणि केरळही याचीच उदाहरणं आहेत. आसाम भाजपला जिंकता आलं कारण त्यांच्याकडे स्थानिक चेहरा होता. अन्य राज्यांमध्ये तो नाहीये म्हणून भाजप त्याच त्याच पद्धतीने निवडणूक खेळू पाहतो आहे. एकमेव हुकमी पत्ता त्यांच्याकडे आहे तोच प्रत्येक डावाला ते उचलायला जातात आणि त्या हुकमी पत्त्याचं मूल्य ते कमी करत आहेत. हा या निवडणूक निकालाचा अर्थ आहे. ज्या चुका काँग्रेसने एकेकाळी केल्या होत्या त्याच चुका आता भाजप वारंवार करताना दिसतो आहे. काँग्रेसला जी शिक्षा मिळाली तिच शिक्षा आता भाजपलाही मिळू लागली आहे.
बंगालमध्ये भाजपचा पराभव, पाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोणत्या शब्दात केला भाजपवर हल्लाबोल
3) एकच चेहरा घासला जातो आहे असं तुम्ही म्हणत आहात पण दीड वर्षापूर्वी हा चेहरा चालला होता त्याबद्दल काय सांगाल?
गिरीश कुबेर : हो बरोबर आहे कारण तेव्हा लोकसभेची निवडणूक होती, पण पश्चिम बंगालमध्ये तोच चेहरा, तामिळनाडूमधे तोच चेहरा कसा चालेल? पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरोधात राज्यपातळीवर नरेंद्र मोदी थोडेच उतरणार आहेत? प्रत्येक ठिकाणीच तसं होतं आहे. भाजपचं मोठं यश हे जसं मोदींच्या असण्यामध्ये आहे तसंच त्या पक्षाचं अपयश हे फक्त मोदींच्याच असण्यामुळेही आहे. सांबाराचं एक उदाहरण दिलं जातं त्याची शिंग खूप सुंदर असतात, बलशाली असतात. पण जेव्हा धावायची वेळ येते तेव्हा त्या शिंगाचं त्याला ओझं होतं.
4) एका बाजूला आपण पाहतोय की मोदींचा चेहरा चालला नाही, दुसऱ्या बाजूला काँग्रेस काहीही करू शकलं नाही. केरळमध्ये सत्तापालट होते असं बघतो पण डावे पुन्हा निवडून येतात. काँग्रेसचं चाललंय काय?
गिरीश कुबेर: भाजपला जो नियम लागू होतो तेच काँग्रेसलाही लागू होतं आहे. केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये पश्चिम बंगालमध्ये राज्यपातळीवर राहुल गांधी थोडेच उतरणार आहेत त्यासाठी तिथलाच चेहरा हवा. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम काँग्रेसचा स्थानिक नेता कोण असा प्रश्न विचारला तर याचं उत्तर काँग्रेसच्या लोकांनाही देता येणार नाही. स्थानिक नेतृत्वाची इतकी माती त्यांनी करून टाकली आहे की प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना येता येणार नाही. हाच नियम भाजपलाही लागू होतो आहे. याचा अर्थ इतकाच आहे की स्थानिक पातळीवर नेते निर्माण करावे लागतील. एकट्याच्या जिवावर तुम्ही पक्ष यशस्वी करू शकत नाही. राजकारणात तुम्हाला माणसांची गरज लागते, राजकारण हे माणसांचं असतं, माणसं लागतात. काँग्रेसकडे माणसं आहेत कुठे? शशि थरूर, ओमान चंडी यांच्याबाबतीत किती घोळ घातला काँग्रेसने? धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच राहुल गांधींची आणि पर्यायाने काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेसकडे स्थानिक नेतृत्व नाही किंवा संघटना नाही त्यामुळे लढण्याची ईर्षाच नाही. आता ममता बॅनर्जींना जेवढं भाजपला पराभूत करणं महत्त्वाचं आहे तेवढंच स्वतःचं नेतृ्त्व प्रस्थापित करणंही महत्त्वाचं आहे ना. काँग्रेसजनांना स्थानिक पातळीवर राहुल गांधींना यशस्वी करून काय साध्य होणार आहे? स्थानिक नेतृ्त्वाला जे वाटतं की आम्ही जिंकून दाखवलं तसं होतंच नाही कारण नेतेच नाहीत.
बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना ! ममतांचं कौतुक करणाऱ्या राज्यातल्या नेत्यांना फडणवीसांचा टोला
5) आणखी एका गोष्टीबाबत ही निवडणूक चर्चेत होती आणि ती गोष्ट होती ध्रुवीकरण, मतांचं ध्रुवीकरण होईल आणि बंगालची निवडणूक जिंकली गेली अशी चर्चा होती, मुस्लिम तुष्टिकरणाचा जेवढं त्यांच्यावर आरोप लावला जाईल तेवढं ध्रुवीकरण होईल असं वाटलं होतं मात्र हा ध्रुवीकरणाचा मुद्दा चालला की नाही?
गिरीश कुबेर- ध्रुवीकरणाचा मुद्दा पश्चिम बंगालमध्ये चालला असं वाटत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ध्रुवीकरणाचा मुद्दा कधी चालतो जेव्हा तुम्ही काहीतरी काम केलेलं असतं, ते भरीव असतं तेव्हा ध्रुवीकरणाचा मुद्दा हातचा म्हणून वापरला जातो. ध्रुवीकरण तेव्हाच काम करतं. आत्ता भाजपकडे दाखवायला काहीच नाही. कोरोना हाताळणीची बोंब आहे, आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. नेतृत्वाच्या पातळीवर तुमच्याकडे चेहरा नाही आणि फक्त तुमच्याकडे ध्रुवीकरण आहे असं नाही चालू शकत. तीन अधिक एक घटक म्हणून तुम्ही ध्रुवीकरण वापरू शकता पण एकमेव ध्रुवीकरण हे तुमच्या आधाराला कधीच येऊ शकत नाही. काँग्रेसवर जेव्हा ध्रुवीकरणाचा आरोप होतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की इतर तीन मुद्दे होते त्यामुळे ध्रुवीकरण झालं. बाकीचे मुद्दे कामच करत नाही आणि ध्रुवीकरणाच्या मुद्दयावर जिंकता येईल असं होत नाही.ध्रुवीकरणाचाच आधार घेणाऱ्या राजकीय पक्षांनी हा मुद्दा लक्षात घेतलं पाहिजे. आधी काम करण्याच्या जोरावर 40-50 मार्क मिळवा तेव्हा ध्रुवीकरणाचे 10-15 मार्क मिळू शकतात. तुमचा पेपर कोरा आहे आणि तुम्ही ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवाल ती बाब चालणार नाही. चाललं नाही ते खूप आशादायी आहे.
प्रांतिक अस्मितेचं महत्व तुम्ही समजू शकता – राज ठाकरेंकडून ममता दीदी, स्टॅलिन यांचं अभिनंदन
6) प्रादेशिक पक्ष हेच भाजपला टक्कर देऊ शकत आहेत का? बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू काही प्रमाणात महाराष्ट्रात हेच चित्र दिसतं आहे त्याबद्दल काय सांगाल?
गिरीश कुबेर : यातही इतिहासाची पुनरावृत्ती आहे.. ज्या चुका इतिहासात काँग्रेसने केल्या त्याच चुका आता भाजप करताना दिसतं आहे. काँग्रेस पक्ष त्या काळात इतका वाढला की त्यांनी स्थानिक पातळीवरचे पक्ष, स्थानिक भावना याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. स्थानिकांना आपल्या राजकीय व्यवस्थेतून बादच करण्याचा प्रयत्न केला मग आंध्रच्या विमानतळावर राजीव गांधींनी केलेला अपमान असो किंवा यशवंतराव चव्हाण यांच्याबाबत काँग्रेसने केलेली भूमिका असो. आता अशा प्रादेशिक पक्षांची मदत घेऊन भाजप उभा राहिला. भाजपचं जे देशस्तरीय आव्हान आहे ते प्रादेशिक आपलं म्हणून झालं आहे. महाराष्ट्रात ताकद वाढवायची आहे मग शिवसेनेला सोबत घ्या, ताकद वाढली की ढकलून द्या. जी चूक काँग्रेसने त्यावेळेला केली तीच चूक भाजप करताना दिसतो आहे. त्यामुळे स्थानिक पक्षांनी काँग्रेसला जसं उत्तर दिलं तसंच उत्तर भाजपलाही मिळेल. ज्या ज्या पातळीवर असं होतं आहे तिथे तिथे स्थानिक पक्ष एकत्र येणारच. अगदी तो आंध्र किंवा तेलंगण असो किंवा महाराष्ट्र असो. भाजपला जो गर्व झाला आहे तिथे हे पक्ष त्यांच्या गर्वाचा फुगा फोडत आहेत. हाच मार्ग देशाची प्रादेशिकता किंवा संघराज्य व्यवस्था आहे त्यासाठी महत्त्वाचा ठरेल. आगामी निवडणुकाही भाजपव विरूद्ध 20-25 प्रादेशिक पक्ष असंच चित्र पाहण्यास मिळेल. शरद पवार जे म्हणाले होते त्यात तथ्य आहे त्या पद्धतीने फासे पडताना दिसत आहेत.
7) 2 मेनंतर बघा महाराष्ट्रात काय होतं हे देखील बोललं जात होतं आता त्याची काही शक्यता राहिली आहे का?
गिरीश कुबेर-सत्ता अमर्यादपणे आल्यानंतर जी काही मस्ती येते त्यातून 2 तारखेनंतर काय होईल ते बगा वगैरे गोष्टी सांगितल्या जातात. तसं काही महाराष्ट्रात करायचं असतं तर भाजप आधीच करू शकला असता. आता तर ते अजिबातच करू शकणार नाहीत ज्या पद्धतीने निवडणुकीचे फासे भाजपच्य पदरात पडले आहेत ते बघता सरकार बरखास्त करणं भाजपला अजिबात शक्य नाही. केवळ राजकीय अर्थाने नाही तर कोरोना हाताळणी हे जर महाराष्ट्र सरकार बरखास्तीचं कारण ठरवलं गेलं तर हे कारण दहा पटीने केंद्र सरकारच्या बरखास्तीचंही कारण ठरू शकतं. ज्या पद्धतीने केंद्राने या सगळ्या गोष्टी आपल्या हातात घेतल्या होत्या, देशाचे गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये घरचा किल्ला असल्यासारखं पश्चिम बंगालमध्ये लढवत होते. त्यामुळे महाराष्ट्राला राजकीयदृष्ट्या काही सांगायचा नैतिक अधिकार भाजपकडे आहे असं अजिबात नाही. त्यामुळे सरकारवर काही कारवाई होईल असं काही वाटत नाही.
तृणमूल मधला कचरा घेऊन भाजप विजयाची स्वप्न पाहत होतं – प्रशांत किशोर
8) पंढरपूरला पोटनिवडणूक झाली, तिथे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढाई होती तिथे भाजपचा उमेदवार जिंकताना दिसतो आहे, ही गोष्ट धोक्याची घंटा आहे ?
गिरीश कुबेर – महाविकास आघाडी सरकारसाठी अनेक धोक्याच्या घंटा घणघणत आहेतच पण पंढरपूरच्या पोट निवडणुकीचा फारसा काही परिणाम होईल असं वाटत नाही. कारण एकच पोटनिवडणूक हे जर उदाहरण मानायचं असेल तर बेळगावचं उदाहरण बघा. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एक पोटनिवडणूक हा काही फार मोठा कल मानता येईल असं मला अजिबातच वाटत नाही. अतिशय स्थानिक पातळीवर ही निवडणूक लढवली गेली. हेवेदावे, कोरोना, मतदानाचं झालेलं कमी प्रमाण अशी अनेक कारणं आहे.
दाढी करा आणि जे केलंय ते पूर्ववत करा; निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचा टोला
9) खरंतर एका निवडणुकीचा दुसऱ्या निवडणुकीशी संबंध जोडायचा नाही असं म्हटलं जातं पण तरीही ही निवडणूक काय सांगून जाते आहे? बंगालकडून अखिलेश यादव, मायावती, भाजप यांनी काय शिकण्यासारखं आहे कारण पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत.. महाराष्ट्राच्या दृष्टीने बंगालचे निकाल किती महत्त्वाचे वाटतात?
गिरीश कुबेर : सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही ध्रुवीकरण होवो, पंतप्रधान निवडणूक यंत्रणा असो पण तुमच्या खात्यात दाखवण्यासारखे दोन-तीन तरी मुद्दे असले पाहिजेत ज्यावर तुम्ही निवडणूक जिंकू शकता. पश्चिम बंगालमध्ये महिलांसाठी ज्या योजना ममता बॅनर्जींनी राबवल्या त्याचा मोठा त्यांच्या या विजयामध्ये आहे. महिला मतदार त्यांच्यापासून ढळल्या नाहीत हे महत्त्वाचं आहे. जमेच्या बाजूला काही मुद्दे असले पाहिजेत. विरोधी पक्ष कितीही तगडा असो तुम्ही विरोधक आयात करू शकत नाही. तुम्ही उमेदवार आयात करू शकता. बंगालमध्येही अनेक लोक भाजपने आपल्या पक्षात घेतले पण ते तुमच्या पक्षात आल्याने संत सज्जन होत नाही. या सगळ्याच्या पलिकडे म्हणजेच प्रचार आणि प्रसाराच्या पलिकडे राजकीय कार्यक्रम तयार करण्याची क्षमता असेल तर मार्ग काढू शकता. भारतीय व्यवस्थेत तुम्ही निरोप्यांची गळचेपी केलीत तरीही निरोप त्यांच्या पलिकडे जाऊ शकतो. बंगालच्या बाहेरच्या जनतेला असं वाटत होतं की भाजपच बंगालमध्ये बाजी मारणार पण तसं घडलं नाही. मात्र बंगालचं चित्र आश्वासक आहे, सरकार किंवा माध्यमं यांच्या पलिकडे निरोप देण्याची घेण्याची क्षमता असते. ते या ठिकाणी दिसून आलं.
10) 2014 मध्ये मोदी जिंकून आले तेव्हा अनेकांनी असं लिहिलं होतं की भाजप स्थानिक पक्षांनाही भारी पडू शकतो, मात्र हळूहळू या सगळ्या गोष्टी मिथ्या होत्या हे दिसून आलं. महाराष्ट्रात स्थानिक ताकद जास्त वाढू शकत नाहीये. तामिळनाडू, बंगाल यामध्ये जे दिसलं ते महाराष्ट्रात दिसत नाही त्याबद्दल काय सांगाल?
गिरीश कुबेर -याचं महत्त्वाचं कारण हे आहे की आपले स्थानिक राजकीय पक्ष कष्टांबाबत प्रामाणिक नाही हे मान्य करावं लागेल. द्रमुक किंवा तेलगू देसम असेल हे ज्या पद्धतीने राजीव गांधींच्या विरोधात उभे राहिले. अण्णा द्रमुक, द्रमुक यांचं राजकारण असेल किंवा ममता बॅनर्जींचं राजकारण असेल या राज्यांमध्ये जसं राजकारणासाठी कष्ट घेण्याची वृत्ती दिसते ती महाराष्ट्रातल्या स्थानिक राजकीय पक्षांमध्ये दिसत नाहीत. आपले पक्ष हे काँग्रेसच्या छावणीत किंवा भाजपच्या छावणीत असेच राहिले आहेत. राष्ट्रवादीला प्रादेशिक पक्ष मानायचं असेल तर भाजप विरोधातला आहे म्हणून प्रादेशिक आहे. पण काँग्रेसच्या विरोधात भाजप अशी जागा निर्माण करू शकला नाही. ती गत शिवसेना आणि मनसेचीही झाली. त्यामुळे आपल्याकडच्या स्थानिक पक्षांना कष्ट करण्याची जोपर्यंत जाण येत नाही तोपर्यंत हे चित्र असंच दिसू शकतं. ममता बॅनर्जींनी जिवाचं रान केलेलं आपण पाहिलं सलग पंधरा वर्षे राज्यावर येणं हे मोदींच्या नंतर त्यांना जमलं आहे त्या तितक्याच तोलामोलाच्या आहेत हे विसरता येणार नाही. ममता बॅनर्जींनी जे कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. तितके प्रामाणिक कष्ट आपल्या लोकांनी घेतलेले नाहीत. त्यामुळे भाजपचा विरोध किंवा केंद्रात जो कुणी असेल त्याला विरोध इतक्यापुरतंच आपल्या प्रादेशिक पक्षांचं असित्त्व मर्यादित आहे. अजून तरी काही काळ तसंच राहिल असं दिसतं आहे.
बंगालकडून महाराष्ट्र काय शिकतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे, ममता बॅनर्जींनी जे करून दाखवलं त्यामुळेच त्यांचं यश मोठं आहे. महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांच्या पावलावर पाऊल टाकतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT