Loudspeaker Row : संदीप देशंपाडेंच्या अडचणी वाढल्या, गृह राज्यमंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई तक

• 01:34 PM • 04 May 2022

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरून फरार झालेल्या देशपांडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात दादर पोलिसांत देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. […]

Mumbaitak
follow google news

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरून फरार झालेल्या देशपांडे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात दादर पोलिसांत देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

हे वाचलं का?

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आज काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र, मनसेकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर राज्यभरात पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू आहे.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा निर्धार कायम! पहा पत्रकार परिषद

दरम्यान, आज सकाळी राज ठाकरे यांच्या मुंबईतील घराबाहेर ड्रामा बघायला मिळाला. या घटनेनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे गायब झाले असून, आता त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

संदीप देशपांडे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्याबाहेर माध्यमांशी बोलत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांना चकमा देत संदीप देशपांडे फरार झाले. यावेळी पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाली.

दिवसभरात कधीही भोंग्यांवरून बांग दिली तर हनुमान चालीसा वाजणारच, राज ठाकरेंचा इशारा

प्रकरणात संदीप देशपांडे यांच्याविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून, या प्रकरणाची राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही दखल घेतली आहे.

गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

सांगा वसंत कुणी हा पाहिला? पुणे मनसे कार्यालयावरच्या शुकशुकाटानंतर एकच चर्चा

‘मनसेचे संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली असून, सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत,’ असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

शिवतीर्थ बाहेर घडलेल्या घटनेपासून संदीप देशपांडे गायब झाले आहेत. सध्या मुंबई पोलीस संदीप देशपांडे यांच्या मागावर आहेत. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात देशपांडे यांना अटक होण्याचीही शक्यता आहे.

    follow whatsapp