मुंबईसह महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील काही दिवसात राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली होती. पण गेल्या दोन दिवसात राज्यात पुन्हा ४ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या मुंबईत ६०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. त्यामुळे आकडेवारीमुळे लोकांना घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील कोविड 19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित हे इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना असं म्हणाले की, कोरोना हा साथीचा आजार हा अद्याप नष्ट झालेला नसल्याचं लोकांना उमगलं आहे. हे समजण्यास त्यांना थोडा उशीर झाला आहे. पण त्यांना ही गोष्ट समजली हे महत्त्वाचं आहे. मला वाटतं की, लोकांना अद्यापही सतर्क राहण्याची गरज आहे. ट्रेन सुरु झाल्या आहेत, लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना टाळण्यासाठी जे नियम पाळावयाचे ते कठोरपणे पाळले गेले पाहिजेत.’
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची नेमकी संख्या:
1. गेल्या 24 तासात राज्यात 4092 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
2. तर 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
3. राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.70 टक्के एवढा आहे.
4. राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.5 टक्के आहे.
5. राज्यातील अॅक्टिव्ह केस: 35,965
मुंबईतील कोरोनाची स्थिती कशी?
1. मुंबईत एका दिवसात 645 रुग्ण सापडले.
2. सध्या मुंबईत 5608 अॅक्टिव्ह रुग्ण
3. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या: 11,417
4. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्के
5. डबलिंग रेट: 479 दिवस
सध्या राज्यभरात 1,75,416 जण हे घरीच क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत. तर 1,746 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आलेलं आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना डॉ. राहुल पंडित हे असंही म्हणाले की, ‘जवळजवळ 10-11 महिन्यानंतर जनजीवन सुरळीत आहे. प्रत्येक जण नेहमी घरातच बसून राहू शकत नाही. परंतु हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं की, कोरोना अद्याप संपुष्टात आलेला नसल्याने त्याबाबत योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सध्या तरी राज्यातील स्थिती भयानक नाही. तसेच राज्य देखील परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारीत आहे. परंतु अद्यापही लोकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी हे करावंच लागणार आहे. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही टॅग लाइन लोकांना अजिबात विसरता येणार नाही. मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर ही त्रिसूत्री लोकांनी कायम लक्षात ठेवावी.’ असं ते म्हणाले.
जास्तीत जास्त नागरिकांची चाचणी व्हावी यासाठी महापालिकेने शहरातील चाचणी मोहिमेला वेग दिला आहे. यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच ठिकाणी अधिक लक्ष केंद्रीत केलं जात आहे. दरम्यान, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत सध्या आरटी-पीसीआर चाचणीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT