Maharashtra Assembly: ‘आम्हीच धक्काबुक्की केली’; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांमध्ये राडा का झाला?

मुंबई तक

• 06:52 AM • 24 Aug 2022

पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह भाजपविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार दररोज पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. आज याच पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत घोषणाबाजी सुरू केली होती. याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार आमने-सामने आले आणि जोरदार राडा झाला. विधानभवनाच्या पायऱ्यावर […]

Mumbaitak
follow google news

पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांसह भाजपविरोधात शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार दररोज पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसून येत आहे. आज याच पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत घोषणाबाजी सुरू केली होती. याचवेळी दोन्ही बाजूंचे आमदार आमने-सामने आले आणि जोरदार राडा झाला.

हे वाचलं का?

विधानभवनाच्या पायऱ्यावर काय घडलं?

दररोज विधानभवनाच्या पायऱ्यावर शिवसेनेच्या आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी होताना दिसतेय. आज शिंदे गटातील आमदारांनी बॅनर घेऊन पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्या शाब्दिक खटका उडाला. झटापट सुरू असतानाच धक्काबुक्की करायची नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर रोहित पवार, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, अजित पवार यांनी मध्यस्थी केली.

शिंदे गटाचा थेट उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंवर निशाणा

शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. ‘कोविडच्या भीतीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी. युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहोचले यांच्या घरोघरी. पक्ष टिकवण्यासाठी लढणारे गद्दार, पक्ष संपवणारे यांच्यासाठी मोठे खुद्दार. खुर्चीसाठी केले हिंदुत्व हद्दपार, खुर्चीवर बसल्यावर शिवसैनिक केले वेशीपार, खुर्ची गेल्यावर आता फिरतात दारोदार”, असे बॅनर शिंदे गटातील आमदारांनी झळकावले.

‘५० खोके, एकदम ओके’मुळे पडली ठिणगी?

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांकडून शिंदे गटाविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. ताट-वाटी, चलो गुवाहाटी, ५० खोके एकदम ओके. ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके, ५०-५० चलो गुवाहाटी अशा घोषणा सातत्यानं दिल्या जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही नाराजी व्यक्त केली. दररोज घोषणा दिल्या जाताहेत, पण प्रत्येकाची सहन करण्याची हद्द असते असं शिंदे मंगळवारी सभागृहात म्हणाले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (२४ ऑगस्ट) शिंदे गटाने ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर काय घडलं?

मिळालेल्या शिंदे गटाचे आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत असतानाच तिथे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील आमदार आले. यावेळी शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये वाद झाला.

दोन्ही गटांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंच्या आमदारांना मागे सारले. त्यानंतर तणाव निवळला आणि वाद मिटला.

आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली -भरत गोगावले

या प्रकरणाबद्दल बोलताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, ‘आम्ही आज पायऱ्यांवर घोषणाबाजीचा कार्यक्रम ठेवला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून आघाडीतील तिन्ही पक्षाचे लोकं, गद्दार आणि खोके घोषणाबाजी करताहेत. आम्ही जे केलं नाही, ते आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न करताहेत.”

“आम्ही ठरवलं की, वस्तुस्थिती समोर आणावी. ते जेव्हा करत होते, तेव्हा आम्ही आलो नाही. आम्ही १६५-१७० लोक आहोत. ते किती आहेत, माहितीये. अशावेळी आम्ही सर्व लोक एकत्र आलो असतो, तर काय झालं असतं? आमचं बोलणं त्यांना मिरचीसारखं झोबलं. कारण आम्ही त्यांचा सगळा इतिहास बाहेर काढला”, असं भरत गोगावले म्हणाले.

“आमचं झाल्यानंतर ते आले असते, तर पायऱ्या रिकाम्या करून दिल्या असत्या. मध्ये येऊन गोंधळ घालायचा प्रकार केला. आम्ही काय बांगड्या भरल्यात का? म्हणून जशास तसं उत्तर आम्ही त्यांना दिलंय, त्यांनी आमचा नाद करायचा नाही. कारण चुकून पाय लागला, तर आम्ही पाया पडतो. आम्हाला कुणी पाय लावला, तर आम्ही सोडणार नाही”, असा इशारा गोगावले यांनी दिला.

धक्काबुक्कीबद्दल बोलताना गोगावले म्हणाले, “हा तर फक्त ट्रेलर होता. पिक्चर अजून बाकी आहे. ते आम्हाला काय धक्काबुक्की करणार, उलट आम्ही त्या लोकांना धक्काबुक्की केली.”

    follow whatsapp