शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने गोठवलं. त्यानंतर भावनिक भाषण करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली. तसंच भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. एवढंच नाही तर आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही पाच हजार वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंसारखा दानव झाला नाही अशीही टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला आता भाजपने उत्तर दिलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या सगळ्याबाबत फेसबुक पोस्ट लिहित उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे केशव उपाध्ये यांनी?
#ही_तर_तुमच्या_कर्माची_फळे
स्मृतिस्थळाची ज्योत हलतेय, म्हणजेच बाळासाहेबांना त्रास होतोय”
– उद्धवसाहेब, गेल्या २१ जूनला किशोरी पेडणेकरांना अश्रू अनावर झाले होते. बाळासाहेबांचे अजूनही लक्ष आहे यावर किशोरीताईंचा विश्वास होता. तुमचाही नक्कीच असेल. म्हणूनच, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाची वाताहत झाल्याचे खापर इतरांवर फोडू नका. ही तुमच्याच कर्माची फळे आहेत. तुम्ही सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वाघ काँग्रेसच्या दावणीला बांधला. राष्ट्रवादीपुढे गुडघे टेकले. बाळासाहेबांना कधीच मान्य नसलेली सत्तेची पदं स्वतःकडे घेतलीत आणि हिंदुत्वाला लाज वाटणाऱ्या पालघर साधू हत्याकांडावर मौन पाळले.
काँग्रेसकडून होणारा वीर सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन केलात
काँग्रेसकडून होणारा सावरकरांचा अपमान निमूटपणे सहन केलात, सत्तेच्या कैफात स्वाभिमानी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून दहशतवाद्यांशी साटेलोटे असलेल्या नवाबाच्या मांडीला मांडी लावून बसलात. राज्यातील जनता महामारी, अतिवृष्टी, वादळामुळे हतबल झाली असताना भ्रष्टाचारी मंत्र्यांना प्रोत्साहन दिलेत, आणि सत्तेचे सोने करून महाराष्ट्राला मोठे करण्याऐवजी घरात बसून स्वतःभोवती आरती ओवाळणाऱ्यांची टोळी तयार केलीत.
काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला
ज्या दिवशी शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल त्या दिवशी मी हे दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हा तुम्ही खूप लहान होतात. पण बाळासाहेबांची तीच भावना कायम होती. आजही बाळासाहेबांचे शिवसेनेवर लक्ष आहे. त्या दिवशी त्यांच्या स्मृतीस्थळावरची ज्योत थरथरली तेव्हाच हे स्पष्ट झाले असे तुम्ही मानत असाल, तर शिवसेनेची वाताहत ही बाळासाहेबांनी तुम्हाला दिलेली शिक्षा आहे, असे समजा. काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बाळासाहेबांचा अपमान केला, म्हणून त्यांच्या इच्छेमुळेच तुमचे दुकान बंद होत आहे, म्हणून जे काही घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात!
#शिवसेना #बाळासाहेबठाकरे #उद्धवठाकरे
असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ही पोस्ट त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर लिहिली आहे.
ADVERTISEMENT