मुंबई: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात नवं सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन होऊन आता जवळपास एक महिना उलटून गेला आहे तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. विरोधी पक्ष यावर वारंवार टीका करत आहेत. परंतु आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला आहे. उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजपकडून यासाठी चार नावं ठरली आहेत. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या चार जणांची नावं निश्चित झाली आहेत.
ADVERTISEMENT
शिंदे गटातून ‘या’ आमदारांची लागणार वर्णी
शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, सदा सरवणकर, संजय शिरसाट, भारत गोगावले, संजय राठोड, दादा भुसे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून नावं अधिकृत करण्यात आली आहेत तर शिंदे गटाने अद्याप नावं अधिकृत केलेली नाहीत. सुरुवातीला जी नावं समोर आली आहेत त्यावरुन तर असं दिसतंय की विभागवार मंत्रिपदं देण्यात आली आहेत. औरंगाबादमधून दोघांची नावं समोर आली आहेत. मुंबईमधून सदा सरवणकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Exclusive : मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित; होणाऱ्या मंत्र्यांना फोन, उद्या सकाळी बैठक
पहिल्या टप्प्यात १४ मंत्री शपथ घेण्याची शक्यता
राज्यात मागच्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे दोघांचे जंबो मंत्रिमंडळ अशी टीका त्यांच्यावर होत होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेक वेळा टीका केली होती. आता राज्यात पहिल्या टप्प्यात १४ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या राजभवनामध्ये हा शपथविधी पार पडणार आहे.
१० ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन
विधिमंडळाचे रखडलेले पावसाळी अधिवेशन येत्या १० ते १८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाकडून १० ऑगस्ट ते १८ ऑगस्ट पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले आहेत. आगामी अधिवेशन या कालावधीत असल्यामुळे सुट्ट्या रद्द करून हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT