मेडीकल प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या NEET परीक्षेवरुन महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गोंधळ झालेला पहायला मिळाला आहे. NEET परीक्षेवरुन वादंग सुरु असताना तामिळनाडूच्या एम.के.स्टॅलिन यांच्या सरकारने विधानसभेत विधेयक मांडून ही परीक्षाच हद्दपार केली.
ADVERTISEMENT
आता याच धर्तीवर महाराष्ट्रात NEET ची परीक्षा रद्द करण्याबाबत विचार सुरु असल्याचे सुतोवाच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहेत.
NEET परीक्षेवरुन तामिळनाडूने घेतलेल्या निर्णयानंतर देशभरातील अनेक राज्यांमध्ये असा विचार सुरु आहे. तुर्तास या विषयावर राज्य सरकारमध्ये प्राथमिक चर्चा सुरु आहे. सर्व बाजूंनी याबद्दल विचार केला जात आहे. यावर काही मतंही समोर येत आहेत. या प्रकरणात शासन म्हणून जमेच्या बाजू लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या या विषयावरक अभ्यास करुन योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षणमंत्री
तामिळनाडूत पास करण्यात आलेल्या नवीन कायद्यानुसार, मेडीकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे १२ वीचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत. भाजप वगळता सर्व पक्षांनी या विधेयकाला सभागृहात पाठींबा दिला होता. या विषयात मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जुलै २०२१ मध्ये एक समिती स्थापन केली होती. न्यायमूर्ती ए.के. राजन यांच्या अध्यतेखालील या समितीला केंद्राने विरोध दर्शवला होता.
NEET च्या परीक्षेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा सूर तामिळनाडूत पहायला मिळाला. राज्यातील विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत असल्याची ओरड पालकांमध्ये होती. यानंतर स्टॅलिन यांच्या सरकारने याविषयात एका दिवसात विधेयक विधानसभेत आणून संमत करुन घेतलं. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात याविषयी नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT