मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वनियोजित नांदेड-हिंगोली दौरा बाजूला ठेवत सव्वा तास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. एकनाथ शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून, उद्यापर्यंत विस्तार होण्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (८ ऑगस्ट) नांदेड आणि हिंगोलीच्या दौऱ्यावर जाणार होते. सकाळी ११ वाजेपर्यंत एकनाथ शिंदे हे नांदेडमध्ये पोहोचणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशिरापर्यंत नंदनवन बंगल्यावरून बाहेरच पडले नाही. त्यातच देवेंद्र फडणवीस हे नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या दिशेनं सरकारने हालचालींना सुरू केल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरून नंदनवन या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ९० मिनिटं बैठक चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पावसाळी अधिवेशनाबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
शिंदे-भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून, शिंदे गट आणि भाजप अशा दोन्ही बाजूंचे प्रत्येकी सात आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजते. मंत्रिमंडळ विस्तारात सुरूवातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश असणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात विधानसभेतील आमदारांनाच स्थान देण्यात यावं, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचीही चर्चा सुरू आहे.
भाजपतील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात मिळू शकते संधी?
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल निश्चित माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपतून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते, याबद्दल सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात वरिष्ठ आमदारांना स्थान मिळणार असून, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाण यांना संधी दिली जाऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
शिंदे गटातून कुणाची लागणार मंत्रिपदी वर्णी?
शिंदे गटात अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक असले, तरी सुरूवातीला मोजक्याच लोकांना शपथ दिली जाणार असून, यात दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय सिरसाट, अब्दुल सत्तार आणि बच्चू कडू (अपक्ष) यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे.
ADVERTISEMENT