मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी गुडन्यूज दिली आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. इतरवेळी ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये मिळते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणाची खरेदी व इतर कारणांसाठी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आलं आहे. याबाबतच शासन निर्णय आज जारी झाला.
ADVERTISEMENT
या निर्णयामध्ये म्हटल्याप्रमाणे, दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन/ निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन २१ ऑक्टोबर २०२२ रोजी अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वीही शिंदे-फडणवीस सरकारने ५ लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला होता. कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १२ हजार ५०० रुपयांचा बिनव्याजी अग्रीम उचलण्यास मंजुरी दिली होती. हे १२ हजार ५०० रुपये दहा हप्त्यांमध्ये परत जमा करण्याची मुभा कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. त्यानंतर आता दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर महिन्याचं वेतन जमा करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना आणखी दिलासा दिला आहे.
ADVERTISEMENT