विजय वडेट्टीवार यांची अनलॉकची घोषणा आणि त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने घेतलेला यू-टर्न यावरुन महाराष्ट्रात लॉकडाउन की अनलॉक हा निर्माण झालेला संभ्रम अखेरीस संपुष्टात आला आहे. अखेरीस मुख्यमंत्री कार्यालयाने अनलॉकची नियमावली जाहीर केली असून सोमवारी ७ जूनपासून ही नियमावली लागू केली जाणार आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी हा आदेश काढला आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock : मुंबई कितव्या टप्प्यात? लोकल सेवेबद्दल काय झाला निर्णय, जाणून घ्या…
राज्य शासनाच्या या नियमावलीवरुन अजुनही लोकांमध्ये बराच संभ्रम दिसत आहे. ऑक्सिजन बेडची उपलब्धता आणि रुग्ण पॉजिटीव्हीटीचा रेट या दोन निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत. राज्य शासनाने आज अनलॉकचे नियम व निकष जाहीर केले असले तरीही तुमच्या जिल्ह्यात अनलॉक करायचं की नाही याचा निर्णय स्थानिक जिल्हा प्रशासन घेणार आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लॉकडाउन सुरुच असून, सोमवारपासून जिल्ह्यातली कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हा प्रशासन अनलॉकचा निर्णय घेणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियम व निकषांमध्ये, स्थानिक प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्बंध शिथील करायचे की कडक याचा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. निर्बंध शिथील करण्यासाठी जिल्ह्यांची पाच स्तरात गटवारी करण्यात आली आहे. यासाठी सरकारने पाच स्तर निश्चीत केले आहेत.
Maharashtra Unlock News : E-Pass च्या नियमांमध्येही महत्वाचे बदल, प्रवास करताना तुम्हाला परवानगी लागणार का?
सरकारी नियमाप्रमाणे असे असतील पाच स्तर –
१) कोरोना पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे
२) पॉजिटीव्हीटी रेट ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
३) पॉजिटीव्हीटी रेट ५ ते १० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
४) पॉजिटीव्हीटी रेट १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड ६० टक्क्यांपर्यंत भरले असतील असे जिल्हे
५) पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरले असतील असे जिल्हे
कुठल्या स्तरावर काय-काय सुरु होणार?
पहिला स्तर – या भागात सर्व प्रकारची दुकानं सुरु होणार. मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह देखील सुरळीत सुरु राहतील. रेस्टॉरंट्सनाही परवानगी असेल. लोकलसेवा ही सुरळीत होईल मात्र परिस्थितीनुरुप स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुन्हा निर्बंध घालण्याची मूभा असेल.
याव्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणं खुली राहतील, मैदानं खुली राहतील, वॉकिंग-सायकलिंगला परवानगी, सर्व खासगी कार्यालयं उघडण्याची परवानगी, शासकीय कार्यालयं १०० टक्के क्षमतेने, विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतीक, मनोरंजन कार्यक्रमांना मुभा, लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर बंधन नसतील, जीम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असेल. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत होऊन जमावबंदी नसेल.
दुसरा स्तर – दुकानं पूर्णवेळ सुरु राहतील, मॉल-थिएटर्स-मल्टिप्लेक्स-नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील, रेस्टॉरंटनाही ५० टक्के क्षमतेने सुरु राहण्याची परवानगी, लोकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी, सार्वजनिक ठिकाणं-मैदानं खुली राहतील, वॉकिंग-सायकलिंगला परवानगी, खासगी कार्यालयं उघडण्याची मूभा, सरकारी कार्यालयही १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.
याव्यतिरीक्त विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ ही वेळ असेल, चित्रीकरण नियमितपणे करता येईल, सामाजिक-सांस्कृतीक,मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांना परवानगी असेल, अत्यंविधी-बैठका-निवडणूक यासाठी बंधन नसतील, जीम-सलून-स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने परवानगी, सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरु राहील पण आसनक्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करु शकतात. या भागांत जमावबंदी लागू असेल.
तिसरा स्तर – संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्क दुकानं सुरु ठेवण्यात येतील. इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु असतील तर शनिवार-रविवारी बंद असतील.
चौथा स्तर – अत्यावश्यक सेवेतील दुकानं चार वाजेपर्यंत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं पूर्णपणे बंद राहतील.
पाचवा स्तर – अत्यावश्यक सेवेतील दुकानं सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार-रविवार मेडीकल वगळता सर्व दुकानं बंद राहतील. याचसोबत तिसरा, चौथा आणि पाचव्या स्तरात इतर निर्बंधही कायम राहणार आहेत.
ADVERTISEMENT