अहमदनगर जिल्हा रूग्णालय अग्नितांडवात 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता राज्य सरकारने कारवाई केली आहे. या प्रकरणी चार जणांचं निलंबन करण्यात आलं आहे तर दोन जणांना बडतर्फ करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे राजेश टोपे यांचं ट्विट?
1) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा – निलंबित
2) डॉ.सुरेश ढाकणे- वैद्यकीय अधिकारी- निलंबित
3) डॉ. विशाखा शिंदे – वैद्यकीय अधिकारी- निलंबित
4) सपना पठारे- स्टाफ नर्स- निलंबित
5) आस्मा शेख -स्टाफ नर्स – सेवा समाप्त
6) चन्ना आनंत – स्टाफ नर्स- सेवा समाप्त
काय घडली होती घटना?
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात ICU ला लागलेल्या भीषण आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते, या सर्व रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ११ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान या अपघाताची सखोल चौकशी होणार असून आगीचं कारणंही तपासलं जाईल. याचसोबत मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत केली जाईल असंही आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील एका रुग्णालयात लागलेल्या आगीमध्ये काही निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागला होता.
ADVERTISEMENT