दुकानांच्या पाट्या आता मराठीतच! ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुस्तफा शेख

• 12:30 PM • 12 Jan 2022

मुंबईतसह राज्यभरात मराठी वाचवा ही मोहीम सुरू असताना आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत असताना दुकानांवरच्या पाट्या मराठीत नसत. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या असाव्यात असा नियमही सरकारने केला होता. मात्र त्याची अमलबजावणी म्हणावी तशी झाली नव्हती. दुकानदार काही ना काही पळवाटा शोधून या नियमाला बगल द्यायचे. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतसह राज्यभरात मराठी वाचवा ही मोहीम सुरू असताना आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होत असताना दुकानांवरच्या पाट्या मराठीत नसत. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतल्या पाट्या असाव्यात असा नियमही सरकारने केला होता. मात्र त्याची अमलबजावणी म्हणावी तशी झाली नव्हती. दुकानदार काही ना काही पळवाटा शोधून या नियमाला बगल द्यायचे. मात्र आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दुकानांवरच्या पाट्या आता मराठीतच करण्याचा हा निर्णय आहे. त्यामुळे राज्यातील सर्व दुकानदारांना त्यांच्या दुकानावरची पाटी मराठीत करावी लागणार आहे.

हे वाचलं का?

राज्यातील सर्व दुकानांवर मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली. हा निर्णय झाल्याने आता राज्यभरातील दुकानदारांना त्यांच्या दुकानावरची पाटी मराठीत करून घ्यावी लागणार आहे. दुकान कोणतंही असलं तरीही पाटी मराठीत करावी लागणार आहे. इंग्रजी नावांना हरकत नसणार मात्र मराठी नावही तेवढंच मोठं द्यावं लागणार आहे. आधीच्या नियमात दुरूस्ती करत आता सरकारने हा नवा नियम लागू केला आहे.

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (नोकरीचे आणि सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना आणि दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने आणि व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.

    follow whatsapp