विधान परिषद निवडणूक : बावनकुळे विरुद्ध भोयर! काँग्रेसनं भाजपच्या नेत्यालाचं उतरवलं मैदानात

मुंबई तक

• 02:42 AM • 23 Nov 2021

–योगेश पांडे, नागपूर विरोधी पक्षातील नेत्याला स्वःपक्षात सामावून घेत उमेदवारी देण्याची भाजपची रणनिती काँग्रेसने नागपुरात अवलंबल्याचं दिसत आहे. भाजपचे नेते आणि रेशीमबाग स्थित असलेल्या स्मृतिमंदिर भागातील नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना पक्षात घेत काँग्रेसने त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस भोयर यांच्या नावाची सोमवारी रात्री घोषणा केली. नागपुरातील […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर

हे वाचलं का?

विरोधी पक्षातील नेत्याला स्वःपक्षात सामावून घेत उमेदवारी देण्याची भाजपची रणनिती काँग्रेसने नागपुरात अवलंबल्याचं दिसत आहे. भाजपचे नेते आणि रेशीमबाग स्थित असलेल्या स्मृतिमंदिर भागातील नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना पक्षात घेत काँग्रेसने त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस भोयर यांच्या नावाची सोमवारी रात्री घोषणा केली.

नागपुरातील भाजपचे जेष्ठ नेते आणि महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक असलेले डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागपुरात सुरू होती. अखेर सोमवारी (22 नोव्हेंबर) त्यांनी नागपुरातील देवडिया काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर काही तासांतच काँग्रेसकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले भोयर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मैदानात उतरल्याने नागपूर विभागाची स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषद निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याचं चर्चा सुरू झाली आहे.

संघ स्वयंसेवक ते काँग्रेस उमेदवार

डॉ. भोयर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचे नागपुरातील रेशीमबाग स्थित असलेल्या स्मृतिमंदिर परिसरातूनच डॉ. छोटू भोयर हे भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवाशाने भाजप आणि संघ परिवारासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

छोटू भोयर हे बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक सुद्धा राहिलेले आहेत तसेच यांच्या कुटुंबातील सदस्य सुद्धा संघ परिवारासोबत जुळलेले आहेत. डॉ भोयर यांच्या उमेदवारीने गेल्या अनेक दिवसंपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळालेला असून, भोयर यांना काँग्रेस पक्षाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत आपला अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरविले आहे.

डॉ रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना विधान परिषदेसाठी तिकीट देण्याबाबत काँग्रेस नेत्यांमध्ये काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. भोयर यांनी सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भोयर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंददाराआड चर्चा झाली होती.

वर्ध्यातील सेवाग्राममध्ये काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार यांच्यात बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सोमवारी (22 नोव्हेंबर) काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजपमधून आयात केलेल्या छोटू भोयर यांना तिकीट दिलं आहे.

कोण आहेत भोयर?

डॉ रवींद्र उर्फ छोटू भोयर हे भाजपचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात आणि ते नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक सुद्धा आहेत. नागपुरातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे यांचे छोटू भोयर हे भाचे आहेत. ते नागपूरचे माजी उपमहापौर सुद्धा होते. गेल्या अनेक दिवसांपासून भोयर हे भाजप नेतृत्वावर नाराज असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे काँग्रेसकडे ही निवडणूक जिंकण्यासाठी सध्या पुरेसं संख्याबळ नाही, अशा स्थितीत भोयर यांच्यासोबत भाजपचे काही नगरसेवक निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवाराला मतदान करू शकतात आणि यासाठी भोयर यांना काँग्रेसने तिकीट दिलं असल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता डॉ छोटू भोयर काँग्रेस पक्षातर्फे नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

    follow whatsapp