सिंधुदुर्ग : ऐन दिवाळीत तळकोकणात राणे-नाईक वादानं तोंड वर काढलं आहे. हिंमत असेल तर निलेश राणे यांनी 2024 मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी. 2014 मध्ये नारायण राणे यांना पराभूत केलं, निलेश राणेंनाही पराभूत करु, असं आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला भाजपनं अवघ्या काळी वेळात प्रत्यूत्तर दिलं.
ADVERTISEMENT
होय, वैभव नाईक आम्ही तुमचा आव्हान स्वीकारलं. 2024 ची निवडणूक निलेश राणे लढविणार आणि जिंकूनही येणार. पण निलेश राणेंच्या विजयानंतर वैभव नाईकांचं पार्सल आम्ही कणकवलीत परत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद शिरवलकर यांनी दिला. त्यामुळे दिवाळीतच राजकीय फटाकेही फुटायला लागले आहेत.
चौकशीवरुन झाली सुरुवात :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी आकसातून होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. तर ही चौकशी म्हणजे भाजपसोबत येण्यासाठी दबावतंत्राचा भाग असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला.
दोन मोर्चांनी तापलं राजकारण :
या चौकशीचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने नुकताच कुडाळमध्ये मोर्चा काढला होता. यावेळी खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह निलेश आणि नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, या मोर्चाला चा प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘संविधान समर्थन मोर्चा’ काढला होता. या मोर्चात भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
वैभव नाईकांचं आव्हान :
याच मोर्चावरुन वैभव नाईक यांनी भाजपनं आपल्याला धमक्या दिल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. कालच्या मोर्चानंतर वैभव नाईक यांनी कुडाळ येथील शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद घेत भाजपच्या मोर्चाला प्रतिउत्तर देत प्रति आव्हानही दिले. ते म्हणाले, कालचा भाजपचा मोर्चा हा संविधान समर्थनासाठी होता. मात्र संविधानाचे समर्थन कालच्या मोर्चात झालेलंच नाही. माझ्यासोबत आला नाही तर हातपाय तोडू टाकेन, बघून घेतो अशा प्रकारच्या धमक्या या मोर्चातून मला दिल्या गेल्या.
पण या धमक्यांना मी भीक घालत नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या. तसंच हिंमत असेल तर निलेश राणे यांनी 2024 मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी, 2014 मध्ये नारायण राणेंना पराभूत केलं, निलेश राणेंनाही पराभूत करु असं खुलं आव्हान वैभव नाईक यांनी दिलं.
आनंद शिरवलकरांच प्रतिआव्हान :
वैभव नाईक यांच्या आव्हानाला प्रत्यूत्तर देत आनंद शिवलकर म्हणाले, होय, वैभव नाईक आम्ही तुमचा आव्हान स्वीकारल आहे. 2024 ची निवडणूक निलेश राणे लढविणार आणि जिंकून येणार. पण निलेश राणे जिंकल्यानंतर वैभव नाईकांचं पार्सल आम्ही कणकवलीला परत पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही .
भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी :
कालच्या ‘संविधान समर्थन मोर्चा’तील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वैभव नाईक यांनी केली. शिवसेनेच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होतात मग भाजपच्या नेत्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात का गुन्हे दाखल होत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. तर भाषण तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र हुल्लावळे यांनी दिले.
ADVERTISEMENT