live rain news in maharashtra today : ऐन होळी आणि धुळवड उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालं असून, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईच्या फळबागांचे प्रचंड नुकसान झालं आहे.
चार जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने 8 मार्च रोजी राज्यातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 मार्च रोजीही अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यांत पाऊस होण्याचा शक्यता आहे.
फळाबागांचं प्रचंड नुकसान
राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये द्राक्ष, केळी, पपई यांच्या फळबागांना प्रचंड फटका बसला आहे. सोसाट्याचा वारा, गारपीट आणि पावसामुळे फळांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
विरोधकांकडून नुकसानभरपाईची मागणी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. “एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारलं, परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 6 तारखेपासुन 9 तारखेपर्यंत हवामान बदलत जाईल असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार घडलं देखील. आंबा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष, कांदा यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मी नगर जिल्ह्यात देखील हे सगळं पाहिलं आहे”, असं सांगत अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.
विदर्भ, मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा फटका
मध्य आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं.
मुंबईकरांना उकाड्यापासून मिळाला दिलासा
वातावरणात झालेल्या बदलांमुळे आणि पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मुंबईत सोमवारी कमाल तापमान 39.3 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती.
ADVERTISEMENT