मालेगाव: राज्यात एकीकडे तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असं असलं तरीही या तीनही पक्षात सारं काही आलबेल नसल्याचं सातत्याने दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे मालेगाव महापालिकेतील 28 नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तो देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत. त्यामुळे एकीकडे राज्यात सत्तेत एकत्र पण जिल्हा स्तरावर फोडाफोडीचं राजकारण हेच या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
मालेगावमध्ये अनेक वर्ष काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळणारे माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मोठा हादरा दिला आहे. त्याचवेळी मालेगाव महापालिकेच्या काँग्रेसच्या सर्व म्हणजेच 28 नगरसेवकांनी देखील पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी आमदार राशिद शेख हे काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज होते. त्यामुळे आता त्यांनी आपल्या पत्नी आणि महापौर ताहिरा शेख यांच्यासह 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र, एकत्र सत्तेत असताना देखील राष्ट्रवादीने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये मात्र आता नाराजी दिसून येत आहे.
गोव्यात चाललंय तरी काय? पाहा कोणता नेता नेमका कोणत्या पक्षात?
माजी आमदार राशिद खान हे काँग्रेसमध्ये अनेक दिवसांपासून नाराज होते. मात्र, पक्षाला त्यांची नाराजी दूर करता आली नाही त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी त्यांनी सर्वच नगरसेवकांना आपल्यासोबत राष्ट्रवादीत आणल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही पक्षातील लोकांची कोणतीही कामं होतं नाही. बाळासाहेब थोरात वगळता कोणताही मंत्री प्रतिसाद देत नाही. महत्त्वाची खाती असतानाही त्याचा मालेगावसाठी काहीही फायदा अद्याप झालेला नाही. या सगळ्या कारणांमुळेच आपण काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जात असल्याचं राशिद खान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT