Mansukh Mandaviya : भारत जोडो यात्रेला लागणार ब्रेक? राहुल गांधींना पत्र

मुंबई तक

21 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:32 AM)

काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू केलीये. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा आता राजस्थानात पोहोचली असून, भारत जोडो यात्रेच्या वाटेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता बळावताना दिसत आहे. चीनसह जगभरातील अनेक देशात कोरोनाचा पुन्हा एखदा उद्रेक झाला असून, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. भारत जोडो यात्रा राजस्थानात पोहोचलेली आहे. अशातच […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू केलीये. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा आता राजस्थानात पोहोचली असून, भारत जोडो यात्रेच्या वाटेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता बळावताना दिसत आहे. चीनसह जगभरातील अनेक देशात कोरोनाचा पुन्हा एखदा उद्रेक झाला असून, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे.

हे वाचलं का?

भारत जोडो यात्रा राजस्थानात पोहोचलेली आहे. अशातच जगभरात कोविडचा पुन्हा उद्रेक झाला असून, केंद्र सरकार सतर्क झालं आहे. राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंग करण्याच्या सूचना करताना खबरदारी घेण्याचा इशारा दिलाय.

जगभरात कोविडचा स्फोट झाल्यानं राजस्थानातील भाजपच्या दोन खासदारांनी केंद्राला पत्र पाठवलं. पी.पी. चौधरी, निहाल चंद आणि देवजी पटेल यांनी भारत जोडो यात्रेमुळे राजस्थानात कोविडचा प्रसार होत असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. खासदारांच्या पत्राचा हवाला देत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राहुल गांधींना पत्र लिहून काही गोष्टींबद्दल कार्यवाही करण्याची सूचना केलीये.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात काय?

राजस्थानात असलेल्या भारत जोडो यात्रेत कोविड गाईडलाइन्सचे सक्तीने पालन करण्यात यावं. मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच कोरोना लस घेतलेले लोकच यात सहभागी होती, हे निश्चित करावं. यात्रेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना सहभागी होण्यापूर्वी आणि यात्रेतून बाहेर पडल्यानंतर विलगीकरणात ठेवावं.

जर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करणं शक्य नसेल, तर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची स्थिती लक्षात घेऊन आणि कोविड महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी स्थगित करावी, अशी विनंती करतो.

‘मी तुम्हाला विनंती करतो की, खासदारांनी केलेली विनंती लक्षात घेऊन वरील बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती करतो,’ असंही केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलेलं आहे.

आरोग्यमंत्र्याच्या पत्रानंतर काँग्रेसची टीका

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रा स्थगित करण्याची मागणी केलीये. आरोग्य मंत्र्यांच्या या पत्रावरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केलीये. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय की, भारत जोडो यात्रेमुळे मोदी सरकार बिथरलं आहे. सर्वसामान्य लोकांचं लक्ष हटवण्यासाठी भाजप वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी मास्क लावून आणि सारे नियम पाळून घरोघरी गेले होते का? असा सवाल करत काँग्रेसनं भाजपवर टीका केलीये.

    follow whatsapp