बुलढाणा (ज़का खान) : राजमाता जिजाऊ यांच्या जन्म सोहळा कार्यक्रमाला यंदा गालबोट लागलं आहे. राज्यभरातील जिजाऊभक्तांना तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळापासून दहा – दहा किलोमीटर लांब अडवलं होतं, त्यामुळे अनेक जण परत गेली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर या भक्तांना परत पाठविण्यात आलं का? असा सवाल करत पुरुषोत्तम खेडेकर यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
काय म्हणाले पुरुषोत्तम खेडेकर?
राज्यभरातून येणार्या जिजाऊभक्तांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दहा-दहा किलोमीटर अंतरावर बॅरिकेट्स लावून अडविल्यानं अनेक वाहनं आणि माणसं परत गेली, असा आरोप करत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी पोलिसांना फटकारलं.
जन्मसोहळ्यानिमित्त मार्गदर्शन करताना खेडेकर म्हणाले, पोलिसांनी कुणाच्या इशार्यावर ही माणसे अडवली? अनेक वृद्ध नागरिक, लहान बालक आणि महिला या सोहळ्याला येऊ शकले नाहीत. गेली तीस वर्षे हा सोहळा सिंदखेडराजात साजरा होत आहे. कधी दंगेधोपे झाले नाहीत, की येथे येणार्या लोकांनी कधी कुणाचा फुकट चहा पिला नाही.
इथे येऊन कुणी साधी बिडीसुद्धा पित नाही, इतक्या शिस्तीत हा कार्यक्रम वर्षोनुवर्षे होत आहे. असं असताना पोलिसांनी लोकांच्या गाड्या दहा-दहा किलोमीटर अंतरावर का अडविल्या? त्यांना परत जाण्यास बाध्य का केले? याचं उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं. तसंच तुम्ही जर आम्हाला बॅरिगेटस लावून अडविणार असाल तर पुढच्यावेळी आमच्याकडून शांततेची अपेक्षा ठेवू नका, पुढच्यावेळी बॅरिकेट्स लावले तर हे बॅरिकेट्स तोडून आमची लोकं कार्यक्रमाला येतील, गोळीबार झाला तरी बेहत्तर, असा इशारा यावेळी खेडेकर यांनी दिला.
ADVERTISEMENT