तिरुअनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वीच झालेली असून आता इथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. तो म्हणजे केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे ई. श्रीधरन हे असणार आहे.
ADVERTISEMENT
देशातील मेट्रो मॅन अशी ओळख असणारे ई श्रीधरन आता आपल्याला राजकारण्याचा आखाड्यात दिसणार आहेत. ई श्रीधरन यांचा भाजपमधील प्रवेश हा केरळ भाजपसाठी मोठं यश मानलं जात आहे. मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीधरन हे या उत्तम स्वच्छ प्रतिमेचे प्रशासकीय अधिकारी अशी आहे. दरम्यान, 25 फेब्रुवारी 2021 रोजी ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.
पाच राज्यातील निवडणुकीविषयी बातमी: बंगाल, आसाम, केरळसह पाच राज्यांधील निवडणुकांच्या तारखा जाहीर
राजधानी दिल्लीत मेट्रो अस्तित्वात आणण्यामध्ये ई श्रीधरन यांचा खूप मोठा हातभार आहे. दिल्ली मेट्रो व्यतिरिक्त श्रीधरन यांनी कोलकाता मेट्रो, कोची मेट्रो आणि देशातील वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पांसाठी मोलाची कामगिरी केली आहे. म्हणूनच त्यांना भारताचे ‘मेट्रो मॅन’ असे म्हटले जाते.
ई श्रीधरन यांना 2001 साली पद्म आणि 2008 साली पद्दविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. फ्रान्स सरकारने देखील ई श्रीधरन यांना 2005 साली आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
ही बातमी देखील पाहा: “बंगालमध्ये BJP ने १०० जागा जिंकल्यास राजकीय अंदाज वर्तवणं सोडेन”
श्रीधरन यांचा जन्म 12 जून 1932 रोजी केरळच्या पलक्कडमध्ये झाला होता. ई. श्रीधरन यांनी सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी आंध्रप्रदेशच्या काकीनाड येथील शासकीय इंजिनिअरींग कॉलेजमधून मिळवली होती. त्यानंतर ते भारतीय रेल्वे सेवेत दाखल झाले होते.
दरम्यान, 88 वर्षाच्या श्रीधरन यांना भाजपने मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे. कारण की, भाजपमध्ये गेल्या काही वर्षापासून 75 वर्षांवरील लोकांना सक्रीय राजकारणात प्रवेश नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरीही 88 वर्षीय ई श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून भाजपने घोषित केलं आहे.
केरळमध्ये विधानसभेसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात हे मतदान पार पडणार आहे. मात्र, या निवडणुकीचा निकाल हा 2 मे रोजी जाहीर होणार आहे.
ADVERTISEMENT