मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षांनंतर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आम्हाला दोघांनाही वाटत नाही की आयुष्यात पुढे आपण एकत्र राहू शकू. त्यामुळे आता आम्ही आमचं 27 वर्षांचं नातं संपुष्टात आणतो आहोत. जगातली सर्वात मोठी संस्था बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन याचं काम मात्र आम्ही एकत्र करत राहू. मात्र आम्ही आता पती-पत्नी म्हणून सोबत राहू शकत नाही’ असंही बिल गेट्स यांनी जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे बिल गेट्स यांनी ?
मागच्या 27 वर्षांच्या अत्यंत छान नात्यानंतर आम्ही आता आमचं लग्नाचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या सत्तावीस वर्षांमधला हा प्रवास नितांत सुंदर असा होता. आम्ही अत्यंत कष्ट घेऊन फाऊंडेशन उभं केलं आहे. आमच्या या फाऊंडेशनचं काम एकत्रितपणे सुरू राहिल. मात्र आता आम्ही जोडपं म्हणून एकत्र राहू शकत नाही. आम्हाला दोघांनाही आमची प्रायव्हसी हवी आहे आणि ती आम्ही दोघेही जपणार आहोत. आता आम्ही आमचं नवरा-बायको हे नातं मात्र संपुष्टात आणतो आहोत.
1980 च्या दशकात बिल आणि मेलिंडा या दोघांची ओळख झाली. मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्ट काम करायला सुरूवात केली होती. तीन मुलांचे पालक असलेले पालक बिल आणि मेलिंडा हे दोघे मिळून बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन नावाची संस्था चालवतात. साथीच्या आजारांनी त्रस्त झालेल्या मुलांच्या आरोग्यावर, लसीकरणासाठी या संस्थेने पुढाकार घेऊन कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत.
गिव्हिंग प्लेज सुरू करण्यात बिल-मिलिंडा गेट्स आणि वॉरेन बफे यांचा पुढाकार होता. गिव्हिंग प्लेज म्हणजे उद्योगपतींकडून सामाजिक कार्यासाठी पैशाच्या रूपात दिलं जाणारं भरीव योगदान. फोर्ब्स मासिकानुसार, 124 बिलिअन डॉलर्स इतक्या प्रचंड संपत्तीचे मानकरी बिल गेट्स हे जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती आहेत. 70 च्या दशकात बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मायक्रोसॉफ्ट ही अग्रगण्य कंपनी समजली जाते. या कंपनीच्या माध्यमातून बिल गेट्स यांना पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी सगळं मिळालं आहे.
ADVERTISEMENT