राज ठाकरेंचा नव्या घरात गृहप्रवेश, नव्या बंगल्याचं नाव आहे तरी काय?

मुंबई तक

• 11:03 AM • 06 Nov 2021

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात घरांच्या नावांची वेगळी महती आहे. मातोश्री, वर्षा, सिल्व्हर ओक… ही नावं राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, मागील काही वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईतील दादरमधील ‘कृष्णकुंज’ देखील नेहमीच चर्चेत असायचं. मात्र, आता राज ठाकरे यांनी आपला पत्ता बदलला आहे. म्हणजेच राज ठाकरे हे आपल्या नव्या घरात राहण्यासाठी गेले आहेत. दिवाळीचा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात घरांच्या नावांची वेगळी महती आहे. मातोश्री, वर्षा, सिल्व्हर ओक… ही नावं राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, मागील काही वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईतील दादरमधील ‘कृष्णकुंज’ देखील नेहमीच चर्चेत असायचं. मात्र, आता राज ठाकरे यांनी आपला पत्ता बदलला आहे. म्हणजेच राज ठाकरे हे आपल्या नव्या घरात राहण्यासाठी गेले आहेत.

हे वाचलं का?

दिवाळीचा मुहूर्त साधत राज ठाकरे यांनी आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. ‘कृष्णकुंज’च्या अगदी शेजारीच राज ठाकरे यांनी एक टोलेजंग बंगला उभारला आहे. ज्याला ‘शिवतीर्थ’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांचा पत्ता आता बदलला आहे. कृष्णकुंजच्या शेजारी बांधण्यात आलेल्या या बंगल्यात राज ठाकरे यांनी सहकुटुंब गृहप्रवेश केला. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडले.

कृष्णकुंजच्या शेजारी उभारण्यात आलेलं ‘शिवतीर्थ’ हे सर्व सोयींनी सुसज्ज असं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेलं या बंगल्याचं काम पूर्ण झाल्यानंतर भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांनी गृहप्रवेश केला आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी सकाळी पूजाविधी आटोपल्यानंतर या नव्या बंगल्याच्या पाटीचं अनावरण देखील केलं. एकीकडे अमित ठाकरे यांनी पाटीचं अनावरण केलं तर दुसरीकडे त्याचवेळी राज ठाकरे यांनी आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत येऊन बंगल्याबाहेर जमलेल्या मनसैनिकांना अभिवादन देखील केलं. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई देखील होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात आता होणार ‘शिवतीर्था’ची चर्चा!

महाराष्ट्राच्या राजकारणात मातोश्री, वर्षा ही नेहमीच चर्चेत असणारी नावं आहेत. कारण येथूनच राज्यातील अनेक महत्त्वाचे आणि राजकारणाला वळण देणारं निर्णय आजवर घेतले जातात. मात्र, असं असलं तरीही मनसे नेते राज ठाकरे यांचं कृष्णकुंज देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे.

मनसेला आतापर्यंत कधीही राज्याची सत्ता मिळालेली नाही. मात्र, असं असलं तरी या पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा नावाचा दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळाला आहे. त्यामुळे पर्यायाने त्यांचं निवासस्थान देखील चर्चेत असायचं. आता राज ठाकरे हे नव्या घरात राहण्यासाठी गेल्याने येत्या काही दिवसात ‘शिवतीर्थ’ हे देखील चर्चेत येणार आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिवाळीनंतर जाणार अयोध्येला, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार

असं असेल राज ठाकरेंचं ‘शिवतीर्थ’

‘कृष्णकुंज’ शेजारीच उभारण्यात आलेला शिवतीर्थ बंगला हा अतिशय आलिशान असा आहे. पाच मजली उंच बंगला हा अतिशय देखण्या पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. यावेळी शिवतीर्थच्या पहिल्या मजल्यावरच समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथेच मनसेचं मुख्य कार्यालय देखील असणार आहे.

या बंगल्यात एक अतिशय भव्य-दिव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. याशिवाय इतर अनेक सोयीसुविधा देखील या बंगल्यात असणार आहे. दरम्यान, सगळ्या शेवटच्या मजल्यावर राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या राहण्याची सोय असणार आहे.

    follow whatsapp