ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने निषेध केल्यानंतर आता मनसेनेही यात उडी घेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसंच त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून उद्या (शुक्रवारी) राहुल गांधी यांच्या सभेच्या ठिकाणीही मनसे आंदोलन करणार आहे. यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.
ADVERTISEMENT
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, राहुलजी तुम्ही भारत जोडो करताय की “मन तोडो” यात्रा करताय? तुमचा सावरकर द्वेष बघून तुमचा राग नव्हे तर कीव येते. आपल्या सोयीने राजकारण करणारे, “फ्रेश” होण्यासाठी विदेश दौरे करणारे, आपल्याच PM च्या सरकारचा निर्णय पत्रकार परिषदेत फाडून त्यांचा अवमान करणारे तुम्ही सावरकरांवर टिका करणे म्हणजे सूर्याकडे बघून थुंकणे होय. असे केल्याने आपलाच चेहरा घाण होतोय याचेही भान तुम्हाला नाही. इथून पुढे देशाचा अभिमान असलेल्या सावरकरांवर टिका केल्यास आम्हालाही तुम्हाला झोंबेल अशाच शब्दात टीकेचे आसूड ओढावे लागतील.
मनसैनिक शेगावच्या दिशेने :
राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, नाशिक इथून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले, राहुल गांधी यांची उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल. सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना आम्ही चोख उत्तर देणार. आमच्या अविनाशने मोठ्या मोठ्या लोकांचे माज उतरवले आहेत, त्यामुळे त्याला देखील घेऊन जात आहोत. पोलिसांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करणार.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता संदीप देशपांडे म्हणाले, सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्रातले नेते चालत आहेत, अशा लोकांना आमचे कार्यकर्ते म्हणतात, “अशा लोकांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”. तर संजय राऊत आहेत कोण? त्यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही, आधी त्यांनी निषेध व्यक्त करावा, ते करू शकत नाहीत म्हणून असे सगळे बोलत आहेत, असंही ते म्हणाले.
सावरकर किती वर्ष तुरुंगात होते आणि नेहरू किती वर्ष होते, हा इतिहास आहे, सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात यात्रा काढायची असेल तर काढा पण असे वक्तव्य करणार असाल तर तुमची जागा जेल मध्ये असेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
ADVERTISEMENT