गुढीपाडव्याला राज ठाकरे यांची सभा झाली. २ एप्रिलला झालेल्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज ठाकरेच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत. कारण त्यांनी ठाण्यात मंगळवारी उत्तर सभा घेतली. त्यानंतर मागचे तीन दिवस त्यांना उत्तरं दिली जात आहेत. अशात आता राज ठाकरेंचा झंझावात पुण्यात असणार आहे.
ADVERTISEMENT
राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा जाहीर झाला आहे. आज दुपारी राज ठाकरे हे पुण्यात जातील. उद्या त्यांचा पुणे दौरा असेल. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्यावेळी सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि महाआरती करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या वेळीच हा कार्यक्रम होणार आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आणि सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आदेश दिल्यानंतर पुण्यात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आधी मुंबई, मग ठाणे आणि आता पुण्यातलं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी १२ तारखेच्या भाषणात काय म्हटलं होतं?
‘3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृह खात्याला विनंती आहे की, कुठेची तेढ, दंगल आम्हाला निर्माण करायच्या नाहीत. मला तशी इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे.’
’12 ते 3 मे महाराष्ट्रातील सगळ्या मशिदींमधील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या त्यांना सांगा सर्व मशिदींवरील लाऊड स्पीकर हे उतरले गेलेच पाहिजे खाली आले पाहिजेत. मग 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास आमच्याकडून होणार नाही.’ असा एक प्रकारे इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा अल्टिमेटम दिल्यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. राज ठाकरे हे भाजपचा भोंगा आहेत असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे शरद पवार यांनीही राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असंही वक्तव्य केलं होतं. आता राज ठाकरे पुणे दौऱ्यात काय काय करणार आणि कुणाचा कसा समाचार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT