Mood Of the Nation: देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे

मुंबई तक

27 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:11 AM)

India Today-C Voter Mood Of the Nation Full Survey: मुंबई: देशातील लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) आता अवघं एकच वर्ष शिल्लक राहिलं आहे. अशावेळी जर आज घडीला लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या तर त्यामध्ये नेमकी कोणाला सत्ता (Power) मिळेल, पंतप्रधान (Prime Minister) म्हणून भारतीयांना कोणाला पसंती दिलीय. तर कोणाला किती टक्के व्होट शेअर मिळेल. यासारख्या अनेक मुद्द्यावर […]

Mumbaitak
follow google news

India Today-C Voter Mood Of the Nation Full Survey: मुंबई: देशातील लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) आता अवघं एकच वर्ष शिल्लक राहिलं आहे. अशावेळी जर आज घडीला लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या तर त्यामध्ये नेमकी कोणाला सत्ता (Power) मिळेल, पंतप्रधान (Prime Minister) म्हणून भारतीयांना कोणाला पसंती दिलीय. तर कोणाला किती टक्के व्होट शेअर मिळेल. यासारख्या अनेक मुद्द्यावर India Today-C Voter ने एक सविस्तर सर्व्हे (Survey) केला आहे. पाहा हाच संपूर्ण सर्व्हे अगदी सविस्तरपणे. (mood of the nation india today c voter what is in minds of indians a survey that will change direction of countrys politics)

हे वाचलं का?

पाहा India Today-C Voter सर्व्हेनुसार देशातील जनता कोणच्या हातात सोपवेल सत्ता

1. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती जागा मिळतील

इंडिया डुटे-C वोटर सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला तब्बल 298 जागा मिळतील. तर UPA ला 153 जागा मिळतील.

याचा अर्थ असा की, या परिस्थितीत सुद्धा NDA चं सरकार येईल. ही गोष्ट स्पष्टपणे दिसते आहे. अर्थात यामध्ये NDA च्या जागा मात्र कमी झालेले पाहायला मिळत आहेत 2019 च्या तुलनेने. मात्र तरीही NDA चं सरकार पुन्हा येऊ शकतं. हे या सर्व्हेतून सध्या तरी दिसतं आहे.

2. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA आणि UPA ला किती व्होट शेअर मिळतील

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA चा व्होट शेअर हा तब्बल 42.8 टक्के एवढा असेल. तर UPA चा व्होट शेअर हा 29.6 टक्के एवढा राहील.

व्होट शेअरमध्ये फारसा काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे NDA च्या बाजूने पुन्हा एकदा कौल पाहायला मिळत आहे.

3. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

2019 मध्ये भाजपच्या 300 पेक्षा जास्त जागा होत्या. त्यामुळे सरकार बनवताना सगळं नियंत्रण हे मोदींकडे होतं.

मात्र आता इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार आज जर लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा किमान 10 ते 11 जागा अधिक मिळू शकतात. म्हणजेच भाजपला 284 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 68 आणि इतरांना मिळून 191 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

4. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाचा किती व्होट शेअर असेल?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपचा व्होट शेअर हा 38.5 टक्के एवढा असू शकतो. तर काँग्रेसचा व्होट शेअर 22.2 टक्के आणि इतरांचा व्होट शेअर हा 39.3 टक्के एवढा राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

5. देशातील जनता पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर किती खूश?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील 45.8 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान म्हणून मोदींची कामगिरी ही उत्कृष्ट आहे. तर 25.7 टक्के लोकांच्या मते त्यांची कामगिरी उत्तम आहे. तर 10.1 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदींची कामगिरी ही साधारण आहे.

तर 7.4 टक्के जनतेच्या मते पंतप्रधान मोदींची कामगिरी ही खराब आहे. तर 8.8 टक्के जनतेला त्यांची कामगिरी ही अतिखराब वाटते. या रेटिंगमध्ये लोकांनी वजन पंतप्रधान मोदींच्या पारड्यात टाकलं आहे.

6. NDA सरकारची मोठी कामगिरी कोणती?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारची सर्वात मोठी कामगिरी ही कोव्हिडमध्ये हाताळलेली स्थिती आहे. 20.4 जनतेच्या मते NDA सरकारने कोव्हिडमधील परिस्थिती योग्यरित्या हाताळली.

तर 13.8 टक्के लोकांच्या मते मोदी सरकारची दुसरी मोठी कामगिरी ही कलम 370 रद्द करण्याची आहे. याशिवाय 11.5 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, राम मंदिर ही आणखी एक NDA सरकारची मोठी कामगिरी आहे. तर 8.3 लोकांचं म्हणणं आहे की, समाजकल्याण योजना ही देखील NDA सरकारने केलेली मोठी कामगिरी आहे.

7. NDA सरकारचं अपयश काय?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश म्हणजे देशातील वाढती महागाई. 25 टक्के लोकांच्या मते महागाई हे NDA सरकारचं अपयश आहे. या पाठोपाठ 17 टक्के लोकांच्या मते बेरोजगारी हे NDA सरकारचं दुसरं अपयश आहे. तर 8 टक्के लोकांना वाटतं की, सरकारने कोव्हिड स्थिती ज्या प्रकारे हाताळली ते त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे. तर 5.5 टक्के लोकांच्या मते नोटाबंदी हे NDA सरकारचं अपयश आहे.

8. कोणत्या राज्यांमध्ये NDA च्या जागांची काय असेल स्थिती?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे आसाम, तेलंगणा, प. बंगाल आणि उ. प्रदेशमध्ये मात्र NDA च्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Mood of the Nation : महाराष्ट्र BJPची झोप उडवणारा कौल, MVA मारणार मुसंडी!

भारत जोडो यात्रेचा मोदी सरकारवर नेमका काय परिणाम होणार?

देशात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा बोलबाला असताना दुसरीकडे त्यांच्या या वर्चस्वाला आणि देशातील सत्तेला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा सज्ज झाले. ‘भारत जोडो यात्रेच्या’ निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुकंलं आहे. आता याच भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार याबाबत India Today-C Voter ने एक सर्व्हे केला असून यात जनतेचा नेमका कौल काय आहे हे सविस्तर जाणून घ्या.

आताच्या सर्व्हेनुसार, भारत जोडो यात्रेला सहा महिने होऊन सुद्धा काँग्रेसच्या मतांमध्ये फारसा फरक झालेला दिसत नाही. काँग्रेसने फारशी उडी मारलेली दिसत नाही. आपण असं मानूयात की, निवडणुकीसाठी राहुल गांधींनी ही यात्रा केलेली नव्हती. पण तरीही त्याचा एक इम्पॅक्ट दिसायला हवा होता. विशेषत: उत्तर भारतात. तो झालेला दिसत नाही.

याबाबत C-Voter चे संस्थापक यशवंत देशमुख यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

यशवंत देमशमुख म्हणाले की, ‘याचं प्रमुख कारण म्हणजे राहुल गांधींनी केरळमध्ये जेवढे दिवस या यात्रेसाठी दिले तेवढे दिवस उत्तर भारतात अजिबात दिले नाहीत. असं आहे की, लोकांना भारत जोडो यात्रेबाबत म्हटलं की, छान यात्र आहे, चांगला प्रयत्न आहे. काहीही नसण्यापेक्षा काही तरी होतंय हे महत्त्वाचं. प्रत्येक राज्यातून यात्रा गेली त्यानंतर राहुल गांधींच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे.’

‘लोकांना असंही वाटतं की, आता राहुल गांधींनी जे केलं ते छान केलं. पण नंतर त्याचा फॉलोअप काय? त्याबाबतीत पुढे काही होणार की, हा फक्त एक इव्हेंट असणार. याबाबत लोकांना जोवर स्पष्टता येणार नाही तोवर रेटिंग फार वाढणार नाही.’

‘पण जेव्हा आम्ही लोकांना विचारतो की, कोणता विरोधी पक्ष नेता प्रभावी आहे. तर त्या प्रश्नावर लोकं अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जीचं नाव घेतात. राहुल गांधींचं नाव घेत नाही. तर अडचण ही आहे की, मोदींचं रेटिंग हे भाजपपेक्षा जास्त आहे. तर राहुल गांधींचं वैयक्तिक रेटिंग हे काँग्रेसपेक्षा कमी आहे.’

‘राहुल गांधींकडे अद्यापही लोक नेते म्हणून पाहत आहेत. तसंच इतिहास देखील हे सांगतो की, एकही यात्रा ही निष्फळ झालेली नाही. जेव्हा-जेव्हा कोणी यात्रा काढली त्याचा त्या व्यक्तीला फायदा झालाच आहे. तर राहुल गांधींनी एवढी मोठी यात्रा काढली त्याचा त्यांना नक्कीच फायदा होणार. सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना फक्त 9 टक्के पसंती मिळाली होती. पण आता या यात्रेनंतर 14 टक्के पसंती त्यांना मिळाली आहे.’

‘सहा महिन्यांआधी राहुल गांधींना 9 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना 7 टक्के पसंती होती. जी त्यांच्यासाठी धोक्याची घंटा होती.’ असं मत यशवंत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

कोणत्या राज्यांमध्ये NDA च्या जागांची काय असेल स्थिती?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर NDA ला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या राज्यांमध्ये त्यांच्या जागा कमी होऊ शकतात. तर दुसरीकडे आसाम, तेलंगणा, प. बंगाल आणि उ. प्रदेशमध्ये मात्र NDA च्या जागा वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सर्व्हेनुसार कर्नाटक आणि महाराष्ट्रात UPA ची कामगिरी सुधारलेली दिसते आहे. जिथे बराच काळ भारत जोडो यात्रा होती. महाराष्ट्रात सर्वात जास्त फटका हा NDA ला बसू शकतो. तर बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्याने तिथेही त्यांना बराच फटका बसू शकतो.

या सर्व्हेनुसार, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा अगदी प्रचंड प्रमाणात काँग्रेसला फायदा होणार नसला तरी काही प्रमाणात ते भाजपला नुकसान पोहचवू शकतात.

महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास BJP ला बसेल मोठा धक्का

आजघडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रातील निकाल काय असतील? महाराष्ट्रात महाविकास आघाडी वरचढ ठरेल की, भाजप प्रणित एनडीए याबद्दल इंडिया टुडे-सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षण केलं. त्याची आकडेवारी भाजपची चिंता वाढवणारी आहे, तर महाविकास आघाडी दिलासा देणारी आहे. आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित एनडीए आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात? याचा घेतलेला आढावा.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA आणि UPA ला किती जागा मिळतील?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार जर आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात NDA (भाजप, शिंदे गट आणि RPI) ला फक्त 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर UPA (मविआ) ला तब्बल 34 जागा मिळू शकतात.

Mood Of the Nation: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या नंबरवर?

महाराष्ट्राने CM म्हणून शिंदेंना स्वीकारलं?

महाराष्ट्रात साधारण सहा महिन्यांपूर्वी अतिशय नाट्यमयरित्या सत्तांतर घडून आलं. तसंच तेवढ्याच नाट्यमरित्या मुख्यमंत्रिपदाची माळही शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली. पण आता सहा महिन्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे नेमके कितव्या स्थानी आहेत आणि त्यांना राज्यातील जनता किती पसंती देते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने स्वीकारलंय का? असा सवालच India Today-C Voter ने केलेल्या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. ज्यामध्ये नेमकं जनतेने काय म्हटलंय हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

जेव्हा आपण फक्त महाराष्ट्रातील जनतेला हा प्रश्न विचारला की, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये शिंदे हे कितव्या स्थानी असावेत. तर त्यात टॉप 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे हे दिसून आलेले नाहीत. म्हणजे त्यांच्याच राज्यामध्ये.. ज्यांच्यावर विसंबून भाजप आपली सगळी व्यूहरचना करतेय. कारण त्यांचं यश हे या युतीवरच अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपण जाणून घेऊयात या सर्व्हेमध्ये राज्यातील लोकांनी नेमकं काय म्हटलं आहे.

पाहा मुख्यमंत्र्यांबाबत लोकांनी दिलेली पसंती, संपूर्ण यादी:

1. नवीन पटनायक (ओडिशा) – 73.2 टक्के लोकांची पसंती

2. अरविंद केजरीवाल (दिल्ली)- 69.2 टक्के लोकांची पसंती

3. हेमंत बिस्वा सरमा (आसाम) – 68.3 टक्के लोकांची पसंती

4. भूपेश बघेल (छत्तीसगड) – 55.7 टक्के लोकांची पसंती

5. शिवराज सिंह चौहान (मध्यप्रदेश) – 54.7 टक्के लोकांची पसंती

6. पुष्कर धामी (उत्तराखंड) – 53.4 टक्के लोकांची पसंती

7. योगी आदित्यनाथ (उत्तरप्रदेश) – 48.6 टक्के लोकांची पसंती

8. M.K. स्टॅलिन (तामिळनाडू) – 45.7 टक्के लोकांची पसंती

9. भूपेंद्र पटेल (गुजरात) – 43.6 टक्के लोकांची पसंती

10. YS जगन मोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) – 39.7 टक्के लोकांची पसंती

महाराष्ट्रातील जनतेच्या मते लोकप्रिय मुख्यमंत्र्यामध्ये एकनाथ शिंदे कितवे?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील जनतेच्या मते एकनाथ शिंदे हे टॉप 10 मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाहीत. म्हणजेच सर्व्हेनुसार, अद्याप तरी मुख्यमंत्री शिंदे हे फारसे लोकप्रिय नाहीत.

याचाच अर्थ स्वत:च्या राज्यात एकनाथ शिंदे यांना जनतेने मुख्यमंत्री म्हणून फार मोठी पसंती दिलेली नाही. कारण या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे टॉप 10 मध्ये देखील येऊ शकलेले नाहीत.

आता या सगळ्या सर्व्हेचा भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कसा विचार करतं आणि निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये CM शिंदे कितव्या क्रमांकावर?

महाराष्ट्रात अगदी अनपेक्षितरित्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं. भाजपकडे 105 आमदारांचं बळ असतानाही अवघ्या 40 आमदारांना घेऊन फुटलेल्या एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं. पण महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री हे किती लोकप्रिय आहेत याबाबत India Today-C Voter ने केलेला सर्व्हेत पाहा जनतेने काय कौल दिला आहे.

खरं तर भाजपने सहा महिन्यांपूर्वी एक अशी गोष्ट केली की, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्यांनी अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसवलं. त्यावरुन अनेक चर्चा झाली की, भाजपला एक असाही मोहरा मिळालाय की, तो मराठाही आहे. पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचं कनेक्शन आहे. तो मोहरा महाराष्ट्राच्या राजकारणात तर भाजपने दोनदा प्रयत्न करून सुद्धा त्यांना स्वत:च्या बळावर सरकार बनवता आलं नाही. ती अडचण भाजपची दूर होऊ शकते. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं रेटिंग काय हे आपण पाहूया.

मूड ऑफ न नेशन सर्व्हेमध्ये विचारलं गेलं की, देशात टॉप 10 मुख्यमंत्री कोण आहेत. तर त्यात पूर्ण देशात योगी आदित्यनाथ हे 39 टक्के पसंतीसह पहिल्या स्थानी आहेत. तर 2.2 टक्क्यांसह एकनाथ शिंदे हे 8 व्या स्थानी आहे.

भारतात आज घडीला सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहेत?

इंडिया डुटे-C वोटरने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचं नाव समोर आलं आहे. त्यांना तब्बल 39 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांना 16 टक्के लोकांनी पसंती दिली असून लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते दुसऱ्या क्रमाकांवर आहेत.

ममता बॅनर्जी तिसऱ्या क्रमांकावर (7 टक्के पसंती), M. K. स्टॅलिन चौथ्या क्रमांकावर (5 टक्के पसंती), नवीन पटनायक पाचव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), हेमंत बिसवा सरमा सहाव्या क्रमांकावर (3 टक्के पसंती), शिवराज सिंह चौहान सातव्या क्रमाकांवर (2.4 टक्के पसंती) आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 8 व्या क्रमांकावर आहेत. त्यांना फक्त 2.2 टक्के लोकांनी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

देशभरातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सगळ्या वरचा क्रमांक आहे. तर दुसरा क्रमांक हा अरविंद केजरीवाल यांचा आहे. पण देशभरात झालेल्या राज्यात एकनाथ शिंदे यांचा मात्र 8वा क्रमांक लागतो.

    follow whatsapp