पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ट्विटरवर वाढत चालली आहे. ट्विटर नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स 70 मिलियन म्हणजेच सात कोटी फॉलोअर्स झाले आहेत. सोशल मीडियावर फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या @narendramodi या अधिकृत ट्विटर हँडलवर आता 70M फॉलोअर्स आहेत.
ADVERTISEMENT
जगाचा विचार केला तर सक्रिय नेत्यांचा विचार केला तर त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय ठरले आहेत. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 8.87 कोटी लोकांनी फॉलो केलं होतं. मात्र त्यांचं अकाऊंट आता बंद झालं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे नवा रेकॉर्ड आता झाला आहे.
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे 19.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. म्हणजेच राहुल गांधी यांचे फॉलोअर्स साधारण 2 कोटींच्या घरात आहेत. मात्र त्यांच्याहून जास्त अमित शाह यांचे फॉलोअर्स आहेत. अमित शाह यांना ट्विटरवर 26.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर 22.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र सर्वाधिक फॉलोअर्स आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर वापरण्यास सुरूवात केली. तेव्हापासून ते ट्विटरवर सक्रिय असतात. 2010 मध्ये नरेंद्र मोदींना 1 लाख फॉलोअर्स होते. 2011 मध्ये ही संख्या 4 लाखांवर गेली आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता इतकी वाढली आहे की त्यांना सात कोटी लोक फॉलो करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये म्हणजेच 2014 असो किंवा 2019 दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात फायदा झाला तो सोशल मीडियाचा. भाजपने केलेला प्रचार, भाजपने निवडणूक प्रचारासाठी केलेली मेहनत हे सगळं महत्त्वाचं होतं मात्र त्या जोडीला सोशल मीडियाची साथ होती. सोशल मीडियाचा मोठा वाटा 2014 च्या निवडणुकीत होता हे विसरता येणार नाही. भाजपच्या यशात भागीदार असणारा सोशल मीडिया खासकरून ट्विटर आणि फेसबुक ही दोन्ही माध्यमं आता मोदी सरकारच्या विरोधात आहेत. मागच्या सात वर्षात मोदी सरकारची भूमिका बदलून गेली आहे.
12 मे 2014 ला मोदींनी काय ट्विट केलं होतं?
सोशल मीडियामुळे अनेक नेत्यांची खोटी आणि बनावट आश्वासनं निवडणुकीच्या मंचापेक्षा पुढे जाऊ शकत नाहीत. सोशल मीडिया हा आणखी शक्तीशाली झाला पाहिजे. या आशयाचं ट्विट मोदींनी केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्विट केल्यानंतर चारच दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावरून आभारही मानले. लोकांशी संवाद साधणं असो किंवा मन की बात असो आत्तापर्यंत अनेक ट्विट्स मोदींनी याच ट्विटर आणि सोशल मीडियाचा आधार घेऊनच केले आहेत. 2019 च्या निवडणुकीपर्यंत भाजप आणि सोशल मीडिया यांचं नातं अतूट होतं.
सोशल मीडिया चपखलपणे कसा वापरायचा याचं तंत्र मोदींनी आणि पर्यायाने भाजपनेही अवगत केलं आहे. मात्र हे वर्ष गाजलं ते मोदी सरकार आणि ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या वादांमुळे. सरकारने आयटी संदर्भात काही नवे नियम लागू केले. फेब्रुवारी महिन्यात हे नियम लागू कऱण्यात आले होते. ते पाळण्यासाठी फेसबुक, ट्विटर, whats app यांना तीन महिन्यांची मुदत दिली होती. त्याविरोधात ट्विटरने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. असं असूनही याच ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतातले नेते ठरले आहेत.
ADVERTISEMENT