हिंगोली : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) काळात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ज्या पद्धतीने पक्षाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं नाही. तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं होतं तर तुम्ही पोराला मंत्री करायला नको होतं. पोराला मंत्री करायचं होतं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं ही वस्तुस्थिती होती. दोघांनी खुर्चा अटवल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि वेगळी चूल मांडली आणि याच भूमिकेतून ही गद्दारी झाली, असे म्हणतं ठाकरे गटाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव (Sanjay Jadhav) यांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला.
ADVERTISEMENT
हिंगोलीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शिवगर्जना मेळाव्यात जाधव बोलत होते. गद्दारी का झाली, शिंदेंनी पक्ष कशामुळे फोडला हे सांगत असतांना जाधव यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मंत्रीपदाकडे बोट दाखवले.
संजय जाधव काय म्हणाले?
ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्याजवळ काही नसताना तुम्हाला सगळं दिलं, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते तुम्हाला दिले. आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने नगरविकास खाते दुसऱ्या कुणालाही दिले नव्हते. ते तुम्हाला दिले, नगरविकास खात्यासारखी कमाई कोणत्याच खात्यात नाही. मोठ्या शहरांमध्ये एका एका जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी करोडो करोडो रुपयांचा माल मिळतो. तरी तुम्ही गद्दारी केली, असं म्हणतं शिंदे गटावर निशाणा साधला.
“अडीच वर्षांचा काळ असाच गेला. त्या काळात आम्हाला जो लाभ व्हायला पाहिजे होता, एक सत्तेचा भाग म्हणून आपल्याला काहीतरी वाटा मिळायला पाहिजे होता, मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. मी वस्तुस्थितीवर बोलतोय, मी दुसऱ्या गोष्टींवर बोलत नाही सध्या. उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने पक्ष संघटनेकडे बघायला पाहिजे होतं किंवा कुणाला तरी बघायला अधिकार द्यायला पाहिजे होता. ते देऊ शकले नाही किंवा स्वतः बघू शकले नाहीत. म्हणून आमच्यावर हा प्रसंग ओढावला हे सत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या चोरांना संधी मिळाली. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर तुम्ही पोराला मंत्री करायला नको होतं. आणि पोराला मंत्री करायचं होतं, तर तुम्ही मुख्यमंत्री व्हायला नको होतं, ही वस्तुस्थिती होती. तुम्ही दोघांनीही खुर्च्या आटवल्यामुळे याला (एकनाथ शिंदे) वाटलं… आता उद्या बाप गेला की पोरग बोकांडी बसेल, त्यापेक्षा मी जर वेगळी चूल मांडली तर काय बिघडलं? या भूमिकेतून ही गद्दारी झाली हे मी सांगतो.”
‘हेम्या, तू शेण खायला…’, खासदार संजय जाधवांचं हेमंत पाटलांवर टीकास्त्र
यावेळी संजय जाधव यांनी हेमंत पाटलांवरही टीका केली. राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. मतदाराच्या रांगेमध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील (Mp Hemant Patil) उभे होते. मी मतदान करून बाहेर आल्यानंतर ते सुद्धा बाहेर आले. त्यावेळी मी त्याला म्हटलं, ‘हेम्या पुन्हा इकडे तिकडे काही गडबड करशील, शेण खायला जाशील. सुदैवाने तू आमदार झालास, खासदार झालास, सासरवाडीही चांगली आहे. एवढी मोठी बँक आहे संस्था आहेत.
यावर हेमंत पाटीलने, “नाय नाय मला साहेब आपल्याला कुठे जायचं नाही, असे सांगितले. आणि तासाभरानंतर तो टीव्हीवर बारा जणात दिसला, असे जाधव यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील आमदार, हिंगोलीत खासदार होतो, त्याने पक्षाशी बांधिलकी जपणे गरजेचे होते. हळदीचे युनिट मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी दिलं, आता नाव घेतो नव्या मुख्यमंत्र्याचं, असा टोला देखील जाधव यांनी पाटलांना लगावला. तसेच हे नेमकं कुणाचा आहे यालाच याचं माहीत नाही, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.
ADVERTISEMENT