कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत पूर्वपदावर येत असलेल्या देशाच्या आर्थिक राजधानी दिलासा देणारी घटना आज घडली आहे. कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 18 महिन्यानंतर प्रथमच शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दोन लाटांमुळे मुंबई पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर मुंबई पुन्हा हळूहळू रुळावर येत असून, शून्य मृत्यूच्या बातमीने मुंबईकरांच्या कोरोनाविरोधी लढ्यालाच बळ मिळालं आहे.
मुंबईत गेल्या 24 तासांत 367 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत 518 रुग्ण कोरोनातून बरे होऊ घरी परतले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासांच्या कालावधीत एकही मृत्यू झाला नाही. मुंबईतील एकूण कोरोना मृतांचा आकडा 16 हजार 180 इतका झाला आहे. 24 तासांत मुंबईत 28,697 कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत 109,57,392 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका असून, सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 5 हजार 30 इतकी आहे. मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी 1214 दिवस इतका असून, कोविड संसर्गाचा दर 0.06 टक्के इतका आहे.
18 महिन्यांपूर्वी झाली होती शून्य मृत्यूची नोंद
कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मुंबईतीत भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. विशेषत: दुसऱ्या लाटेत स्थिती खूपच चिंताजनक बनली होती. त्यामुळे मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केले जात होते. यापूर्वी 26 मार्च 2020 रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली होती.
पुण्यातील कोरोना स्थिती कशी आहे?
पुणे शहरात आज नव्याने 106 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 5 लाख 3 हजार 175 इतकी झाली आहे. शहरातील १२६ कोरोनाबाधितांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला असून, पुणे शहरातील एकूण कोरोनातून बऱ्या झालेल्यांची संख्या 4 लाख 93 हजार 55 झाली आहे.
पुणे शहरात आज एकाच दिवसात 5 हजार 488 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण चाचण्यांची संख्या आता 34 लाख 79 हजार 396 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 56 रुग्णांपैकी 166 रुग्ण गंभीर, तर 221 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर पुणे महापालिका हद्दीत दिवसभरात 2 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आजच्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 64 इतकी झाली आहे.
ADVERTISEMENT