मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोकं वार काढताना दिसतोय. तज्ज्ञांनी जुलैमध्ये चौथी लाट येण्याचा इशारा दिला असून, आता महापालिकेनं चौथी लाट रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर जोर दिला जाणार आहे.
ADVERTISEMENT
कोरोना लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषतः १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महानगरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘हर घर दस्तक’ ही मोहीम १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे.
३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी कोरोना लस घ्यावी, यासाठी नागरिकांना महापालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोना लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात १ जून ते ३१ जुलैपर्यंत ‘हर घर दस्तक मोहीम २’ राबविण्यात येत आहे.
यामध्ये १२ ते १४ वर्ष व १५ ते १७ वयोगटातील सर्व मुलांचं प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.
या मोहिमेत महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन भेटी देत आहेत. या भेटीआधारे १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील पहिला व दुसरा डोस न घेतलेली मुले तसेच बुस्टर डोस न घेतलेल्या ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत.
लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून, विभाग पातळीवरील शाळा व महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत.
मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत १८ वर्ष वयावरील नागरिकांचे पहिला डोस ११२ टक्के व दुसरा डोस १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.
३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १७ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे तसेच १६ मार्च २०२२ रोजी पासून १२ वर्ष ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ अशी एकूण २३२ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत.
१२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसर्या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तर १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे ५७ टक्के व दुसर्या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. थोडक्यात, १८ वर्षावरील पात्र नागरिकांच्या तुलनेत १२ ते १७ या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झाले आहे.
ADVERTISEMENT