कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सुमारे ८ ते १० महिन्यांचा काळ मुंबईतली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद होती. परंतू नवीन वर्षात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर सरकारने ठराविक वेळेत सर्वसामान्यांना लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानेही आजपासून सर्वसामान्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी दिली आहे.
ADVERTISEMENT
सध्याच्या घडीला कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट पूर्णपणे टळलेलं नसल्यामुळे ही सवलत ठराविक वेळेपूरती मर्यादीत असणार आहे. सकाळच्या पहिल्या गाडीपासून ते सात वाजेपर्यंत, यानंतर दुपारी १२ ते ४ तर रात्री ९ वाजल्यापासून शेवटच्या गाडीपर्यंत अशा ठराविक वेळेतच सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मूभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी सर्वसामान्य प्रवाशांचा तुरळक प्रतिसाद मुंबईच्या स्थानकांवर पहायला मिळाला.
राज्य सरकारने सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी दिली असली तरीही वेळेच्या बंधनाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य नोकदरदार वर्ग हा सकाळी सातनंतर कामावर जाण्यासाठी बाहेर पडतो, त्यामुळे लोकल प्रवासाची वेळ सोयीची नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. परंतू कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सध्या सरकारने ठराविक वेळेतच सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे. प्रवासादरम्यान मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग करणं, स्टेशनवर गर्दी होणार नाही याची काळजी घेणं या सर्व गोष्टींची काळजी प्रवासी आणि स्थानिक सरकारी यंत्रणांना घ्यायची आहे.
ADVERTISEMENT