मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवार 18 जुलै 2021 च्या रात्रीपासून पावसाने जोर धरला. हा पाऊस पहाटे चार वाजेपर्यंत सातत्याने सुरू होता. त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा, 24 विभाग कार्यालयं, मुख्य आपात्कालीन नियंत्रण कक्ष आणि 25 सहाय्यकारी नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल ही सगळी यंत्रणा रात्रभर अव्याहतपणे कार्यरत होती.
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेची सर्व प्रमुख रूग्णालयं आणि उपनगरीय रुग्णालये यांना देखील खबरदारीची उपाययोजना म्हणून आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ६० ठिकाणी असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रांवर या पावसाची नियमित नोंद घेतली जात होती. स्वयंचलित हवामान केंद्रांद्वारे उपलब्ध होत असलेल्या पावसाच्या या आकडेवारीचे सातत्यपूर्ण विश्लेषण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षामध्ये करण्यात येत होते व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांना रात्रभर नियमितपणे देण्यात येत होत्या.
रात्री 11 वाजल्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसाचा जोर पहाटे 4 वाजेनंतर कमी झाला. रात्री 11 ते पहाटे 4 या साधारणपणे पाच तासांच्या कालावधी दरम्यान अनेक ठिकाणी तब्बल 200 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यानुसार सर्वाधिक म्हणजे 226.82 मिलिमीटर इतका पाऊस हा ‘आर उत्तर’ विभाग क्षेत्रातील दहिसर अग्निशमन केंद्र येथे असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे नोंदविण्यात आला आहे.
दहीसर खालोखाल चेंबूर परिसरात 218.45 मिलिमीटर, विक्रोळी पश्चिम परिसरात 211.08 मिलिमीटर, कांदिवली परिसरात 206.49 मिलिमीटर, मरोळ परिसरात 205.99 मिलिमीटर, बोरिवली परिसरात 202.69 मिलिमीटर, किल्ला (फोर्ट) परिसरातील महापालिका मुख्यालय येथे 201.93 मिलिमीटर आणि ‘जी दक्षिण’ विभाग परिसरात (वरळी) 200.4 मिलिमीटर इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे उर्वरित स्वयंचलित हवामान केंद्रांवर देखील सदर पाच तासांच्या कालावधीदरम्यान 125.73 ते 199.86 इतका मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT