Sakinaka Rape Case : “महाविकास आघाडी स्थापन होत असतानाच मी हे सांगितलं होतं”

मुंबई तक

• 11:37 AM • 11 Sep 2021

मुंबईतील साकीनाका येथे हादरवून टाकणारी बलात्काराची घटना घडली. घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला असून, राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावरून आता सरकारला लक्ष्य केलं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. कोल्हापूर येथे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘साकीनाका येथे घडलेली घटना भीषण आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतील साकीनाका येथे हादरवून टाकणारी बलात्काराची घटना घडली. घटनेतील पीडितेचा मृत्यू झाला असून, राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावरून आता सरकारला लक्ष्य केलं जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

कोल्हापूर येथे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘साकीनाका येथे घडलेली घटना भीषण आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. गुन्हेगारांची झटपट जामीनावर सुटका होत आहे. त्यानंतर वर्षानुवर्षे असे खटले चालू राहतात. त्यामुळे या खटल्यांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करायला हवी. राज्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही याचा महाराष्ट्र विकास आघाडी शासनाने विचार केला पाहिजे’, अशी मागणी पाटील यांनी केली.

‘राज्यात गेल्या काही दिवसात एका पाठोपाठ अशा घटना घडल्या असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेऊन गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करावा. राज्यात महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या अपराधाच्या घटनांमध्ये सापडत आहेत, पण कारवाई होत नाही. पोलिसांवर दबाव आणला जातो. त्यामुळे गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला अटक होत नाही तसेच कमी प्रभावाची कलमे लावली जातात. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आघाडीच्या अध्यक्षावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला, पण अजूनही अटक झालेली नाही’, असं पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडीचे अनेक नेते विविध प्रकरणात अडकत आहेत. महत्त्वाची सगळी खाती उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला दिली आहेत. त्यामुळे सगळे ब्लेम तुमच्यावर येत आहेत. पैसे खाण्याची परंपरा असलेल्या लोकांच्या हातात महत्त्वाची खाती दिली असून, गृहमंत्रीपद उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे ठेवण्याची गरज मी महाविकास आघाडी स्थापन होतानाच व्यक्त केली होती’, असंही पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. सरकारच्या मनाविरुद्ध वागला की ताबडतोब बदली केली जाते. प्रशासन आणि सरकारच्या सांगण्यावरून विरोधी कार्यकर्त्यांना अडकविण्याचा मोठा उद्योग पोलिसांकडून चालू आहे. राजकीय आंदोलन असले तरीही मोक्काची नोटीस देणे, तडीपारी करणे, पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास भाग पाडणे अशा प्रकारांचा अतिरेक चालू आहे. कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे’, असा आरोप पाटील यांनी केला.

    follow whatsapp