Akola crime : शिंदे गटातील नेत्याची हत्या ‘परफेक्ट क्राईम’?

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

Akola | Bhagwat Deshmukh Murder : अकोला : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुख यांच्या हत्येला आता पाच महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अन् गुन्ह्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना अपयश आलं आहे. त्यामुळे ही एक हत्या ‘परफेक्ट क्राईम’ ठरणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मारेकऱ्याचा शोध लावण्यासाठी […]

Mumbaitak
follow google news

Akola | Bhagwat Deshmukh Murder :

हे वाचलं का?

अकोला : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुख यांच्या हत्येला आता पाच महिने उलटले आहेत. मात्र अद्यापही मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अन् गुन्ह्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना अपयश आलं आहे. त्यामुळे ही एक हत्या ‘परफेक्ट क्राईम’ ठरणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मारेकऱ्याचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी आता या प्रकरणातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला आकर्षक बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच त्याचं नाव गुपीत ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२७ ऑगस्ट २०२२ ला अकोला जिल्ह्यातील पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील कापशीच्या तलावात एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये या मृत युवकाची हत्या झाली असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

तलावाच्या पाण्यात दोन दिवस पडून असल्यानं मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं. ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर २९ ऑगस्टला अंत्यसंस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा घटनास्थळी पंचनामा केला असता एका रुमालमध्ये आधार कार्ड आणि इतर काही वस्तू आढळून आल्या.

यावरुन अधिक चौकशी केली असता संबंधित युवकाचं नाव भागवत अजाबराव देशमुख असं असल्याचं आणि ते अकोल्याचे उपशहरप्रमुख असल्याचं समोर आलं. शिवाय ते बेपत्ता असल्याची तक्रारही अकोल्यातीलच खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरुवात केली होती.

मात्र आता भागवत देशमुख यांच्या हत्येला पाच महिने उलटून गेले आहेत. पण पोलिसांचे हात अद्याप रिकामेच आहेत. या प्रकरणात आतापर्यंत २५ हुन अधिक संशयितांची कसून चौकशी झाली. तरीही पोलिसांना मारेकऱ्याचा सुगावा लागला नाही. भागवत मोबाईल वापरत नसल्यामुळे तपासात अनेक अडचणी येत असल्याचं सांगितलं जात आहे.

आता अखेर पोलिसांनी भागवत देशमुख हत्या प्रकरणात माहिती देणाऱ्या व्यक्तीला आकर्षक बक्षीस जाहीर केलं आहे. तसंच संबंधिताचं नाव गुपीत ठेवण्यात येईल, असेही पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी सांगितले आहे.

‘भागवत’ २५ ऑगस्ट पासून होता बेपत्ता :

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख २५ ऑगस्ट २०२२ रोजी पासून बेपत्ता होते, त्यांचा अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र कुठेही माहिती मिळाली नाही, अखेरीस नातेवाईकांनी भागवत बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस ठाण्यात दाखल केली. दरम्यान, ३१ ऑगस्टला पोलिसांनी नातेवाईकांना या संदर्भात माहिती दिली की भागवत याची हत्या झाली असून तेव्हा कुठलीही ओळख न पटल्याने पोलिसांकडून त्याच्यावर अंत्यविधी केले. पातुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत देशमुख यांची अज्ञात व्यक्तींनी आधी गळा आवळून हत्या केली आणि त्यांचा मृतदेह तलावात फेकून दिला.

भागवत देशमुख नेमके कोण आहेत?

भागवत देशमुख सुरुवातीला शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांचे वाहन चालक म्हणून होते. दरम्यान, काही वर्षानंतर भागवत यांनी आपला प्रवास राजकीय क्षेत्रात वळविला. २३ ऑगस्ट २०२२ रोजी अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्या निवासस्थानी त्यांनी जाहीर प्रवेश केला होता, अन् त्याच्या खांद्यावर शिंदे गटातील शिवसेना उपशहर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली होती, प्रवेशानंतर दोन दिवसातच त्यांची हत्या झाली होती.

    follow whatsapp