–योगेश पांडे,नागपूर
ADVERTISEMENT
नागपूर-उमरेड मार्गावर शु्क्रवारी रात्री भयंकर दुर्घटना घडली. तवेरा गाडी ट्रकवर आदळून सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. एक जण गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नागपूर-उमरेड मार्गावरील राम कुलर कंपनीजवळ हा अपघात झाला.
एका महिलेसह सात जणांना घेऊन तवेरा गाडी (एमएच४९/४३१५) उमरेड मार्गावरून जात होती. भरधाव असलेल्या तवेरा गाडीच्या समोर एक ट्रक जात होता. वेगात असतानाच तवेरा गाडीच्या चालकाने ट्रकला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला.
ओव्हर टेक करत असतानाच तवेरा गाडी ट्रकवर जाऊन आदळली. यात गाडीचा समोरील भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील सात प्रवासी जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर उमरेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघात झालेलं ठिकाण नागपूर शहर पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना दिली. हुडकेश्वर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या अपघातात त्याला जबर मार लागल्याची माहिती असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुर्घटनाग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत हे काम पोलिसांकडून सुरू होतं.
या अपघातात अश्विन गेडाम, स्नेहा भुजाडे, आशिष भुजाडे, सागर शेंडे, नरेश डोंगरे, पद्माकर भालेराव, मेघना पाटील यांचा समावेश आहे. हे सर्व एकाच परिवारातील सदस्य असून, नागपुरातील बेझनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेनंतर नागपुरातील बेझनबाग परिसरात आणि मृतकांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT